बांदा - दाणोली मार्गावर विलवडेत बोलेरो पलटी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 17, 2025 17:33 PM
views 165  views

सावंतवाडी : बांदा - दाणोली मार्गावर विलवडे येथे भर रस्त्यात एक बोलेरो पिकअप गाडी पलटी झाल्याची घटना आज घडली आहे. या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने, या अपघातात गाडीतील चालक आणि क्लिनर यांचा जीव वाचला असून ते दोघेही सुरक्षित आहेत.

ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. गोवा येथून पुण्याला जाताना हा अपघात घडला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यान हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. अपघातानंतर लगेचच स्थानिक ग्रामस्थ आणि परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. तदनंतर जेसीबीच्या सहाय्याने गाडी हलविण्यात आली. या घटनेमुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

दरम्यान, सध्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, साईडपट्टी आणि गटार नसल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी केला आहे.