
सावंतवाडी : कोलगावमधील भाजप मधून निलंबित करण्यात आलेल्या चार ग्रामपंचायत सदस्यांचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या आदेशाने केलेले निलंबन हे पूर्णपणे अन्यायकारक आहे. सावंत हे सुशिक्षित, अनुभवी व राजकारणाची जाण असणारे नेते असून स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे, तसेच महिला सदस्य असूनही आपल्या पुरुषप्रधान वागणुकीने, आम्हाला आमची न्याय बाजू मांडण्याची कोणतीही संधी न देता, आमचे निलंबन केले. याबद्दल आम्हाला जिल्हाध्यक्ष यांची किव येते असा टोला प्रसिद्ध पत्रकाद्वारे प्रणाली टिळवे, संयोगिता उगवेकर, आशिका सावंत व रोहीत नाईक यांनी हाणला आहे.
त्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, आम्ही भारतीय जनता पक्षा करीता गेल्या सुमारे दहा वर्षांपासून केलेल्या प्रामाणिक सेवेची पर्वा न करता झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा आम्ही जाहीर निषेध करतो. सन १९९५ मध्ये नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि तत्कालीन शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर राणे यांच्या कुशल संघटन कौशल्यामुळे, तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत कोलगावच्या रूपात शिवसेनेकडे आणण्याचे काम झालेले होते. त्यावेळी सध्याच्या स्थानिक भाजप नेतृत्वाचा राजकीय क्षितिजावर उदय देखील झालेला नव्हता. सध्याच्या भाजप नेतृत्वाने राजकारणात पाय ठेवला त्या दिवसापासून नारायण राणे यांच्या प्रेमापोटी आम्ही आजतागायत त्यांच्याबरोबर आहोत. परंतु यांची अरेरावी, घराणेशाही आणि मनमानी कारभार तसेच सच्चा कार्यकर्त्यावर असणारा अविश्वास याला कंटाळून, दबाव झुगारून येत्या काळात सामाजिक कार्यात अधिक प्रकर्षाने कार्यरत राहणार असल्याचे या पत्रकातून स्पष्ट करण्यात आले.