
सावंतवाडी : मळगाव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ग्रामस्थांच्या सहभागातून आणि भिल्लवाडी गृपच्या संयुक्त उपक्रमातून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम पाहण्यासाठी मळगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
पावसाळी वातावरण आणि जोरदार पाऊस असूनही गोविंदांचा उत्साह कमी झाला नाही. भरपावसातही प्रेक्षकांनी उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.स्पर्धेत माऊली गोविंदा पथक, वाफोली यांनी कमी वेळेत सहा थरांची मानवी रचना करून दहीहंडी फोडली आणि विजेतेपद पटकावले. विजयी पथकाला ११,१११ रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे बक्षीस समाजसेवक तथा भिल्लवाडी गृप अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
अंतिम फेरीत सिंहगर्जना संघ, बांदा आणि माऊली गोविंदा पथक, वाफोली यांच्यात चुरस निर्माण झाली. मात्र वेग आणि कौशल्याच्या बळावर माऊली पथकाने बाजी मारली. कार्यक्रमस्थळी डिजेच्या थरारक बीट्सवर गोविंदांनी दिलखेचक डान्स करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ढोल-ताशांचा गजर, घोषणाबाजी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने चौकात जल्लोषाचे वातावरण रंगले होते.