
सावंतवाडी : शहराच्या मुख्य रस्त्यांवरील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी आणि आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. या संदर्भात आज शांतता समितीची बैठक पार पडली, ज्यात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी शहरातील पार्किंग समस्येवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मुख्य रस्त्यांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नगरपरिषदेसोबत चर्चा करून किमान एका बाजूने दुचाकी आणि चारचाकी वाहने पार्क करण्याची व्यवस्था केली जाईल, असे त्यांनी सांगितले. तसेच, पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा विचार केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. विशेषतः गणेश चतुर्थीच्या काळात पार्किंगबाबत कठोर भूमिका घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कार्यकाळात पार्किंगसंदर्भात लावण्यात आलेल्या फलकांचा संदर्भ माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर यांनी दिला. शांतता समितीच्या सदस्यांनी शहरात वाढलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासावर चिंता व्यक्त केली.
त्यावर पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी फेरीवाल्यांमुळे लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे सांगितले. तसेच, परप्रांतीय भाडोत्री लोकांची नोंदणी तपासण्याबाबतही लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. सणासुदीच्या काळात गावी जाणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी केली. यावर पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी जनतेने कोणत्याही संशयित व्यक्ती किंवा घटनेची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन केले. जनता आणि पोलिस यांच्या समन्वयाने शांततेत सणासुदीचे दिवस साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले.या बैठकीला सहाय्यक पोलिस निरीक्षक खंदकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी उपनगराध्यक्ष गोविंद वाडकर, व्यापारी संघाचे जगदीश मांजरेकर, पत्रकार अभिमन्यू लोंढे, हिदायततुल्ला खान, बावतीस फर्नांडिस, नंदू गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.