
सावंतवाडी : क्रांतीदिनाचे औचित्य साधून' राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित कॅप्टन बाबूराव कविटकर यांनी मार्गदर्शन केले. क्रांतीदिन भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या दिवसाचे ऐतिहासिक महत्व मोठे आहे असं ते म्हणाले.
तसेच 8 ऑगस्ट 1942 रोजी, महात्मा गांधींनी मुंबई येथे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या बैठकीत 'भारत छोडो' आंदोलनाची घोषणा केली. 9 ऑगस्ट 1942 रोजी, 'भारत छोडो' आंदोलनाला सुरुवात झाली आणि या दिवसाला 'ऑगस्ट क्रांती दिन' म्हणून ओळखले जाते. या आंदोलनाचा मुख्य उद्देश ब्रिटिशांना भारत सोडून जाण्यासाठी दबाव तयार करणे आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हा होता. या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला हादरा बसला आणि भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची नवी ऊर्जा निर्माण झाली. हीच ऊर्जा घेऊन आताच्या तरुण पिढीने भारतीय सैन्यदलात भरती होऊन भारत मातेच्या रक्षणासाठी समर्पणात्मक भूमिका घेतली पाहिजे, असे सांगून भारतीय सैन्य दलात भरती होण्याची प्रक्रिया कसे असते याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते भारतीय स्वतंत्र संग्रामात बलिदान दिलेल्या क्रांतिवीरांना क्रांतीमशाल प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा. डॉ.संजना ओटवणेकर यांनी केले. तसेच उपप्राचार्य डॉ.सुमेधा नाईक यांनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्फूर्तीदायी ठरलेल्या या दिवसाची आठवण तसेच नव्या पिढीला क्रांतिकारकांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिन साजरा केला जातो. असे सांगून थोरक्रांतिवीरांना अभिवादन करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिले. तर उपमुख्याध्यापक संजय पाटील यांनी क्रांतीदिनाचे महत्त्व अधोरेखित करत. आपल्या देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व क्रांतीकारकांना आज विनम्र अभिवादन करूयात! असे सांगून शुभेच्छा दिले. या कार्यक्रमाला दुसरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कॅप्टन श्री. सुभाष सावंत यांनी स्वअनुभवातून सैन्यदलात भरती होण्यासाठी शारीरिक आरोग्यासोबत आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शिक्षण किती महत्त्वाचे आहे. त्यांचे उपयोग भारतीय सैन्यदलात कसे होते हे सांगितले. वीरगती प्राप्त झालेल्या वीरांचे प्रत्यक्षदर्शींनी अनुभव व परिस्थिती या विषयी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच सैन्य दलात शिस्त किती महत्त्वाचे असते. हे छोट्या छोट्या उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उलगडून सांगितले त्यांच्या या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थी भारावून गेले. तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रशालेच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या दोन्ही अतिथींनी आपल्या विद्यार्थ्यांना आणि सर्व शिक्षक वृंदांना भारतीय सैन्यदलातील प्रेरणादायी माहिती आणि मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
तसेच इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! स्वातंत्र्यलढ्याची मशाल पेटवत देशातून इंग्रजी राजवटीला नेस्तनाबूत करण्याची हाक देणाऱ्या तमाम क्रांतिवीरांना अभिवादन करण्याचा हा दिवस. तेव्हा सर्वांच्या हृदयात क्रांतिवीरांची ही मशाल आठवणीच्या रूपाने धगधगत राहिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून क्रांतिवीरांना अभिवादन केले. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत आणि वैयक्तिक गीतगायन करत 'ये मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी' कार्यक्रमातील वातावरण राष्ट्रभक्तीमय करून सोडले. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कमिटी प्रमुख प्रा.डॉ संजना ओटवणेकर, प्रसिद्धी कमिटी प्रमुख प्रा. संतोष पाथरवट, सांस्कृतिक कमिटी सदस्य प्रा. वामन ठाकूर, प्रा.जोसेफ डिसिल्वा, महाश्वेता कुबल, प्रा. विनिता घोरपडे,प्रा. सविता माळगे,प्रा.डाॅ.अजेय कामत,प्रा.रणजीत राऊळ, प्रा.पवन वनवे ,प्रा.दशरथ सांगळे, प्रा.माया नाईक,प्रा.सृहा टोपले,प्रा.निलेश कळगुंटकर , प्रा. राहुल कदम इ. सर्व प्राध्यापक उपस्थित होते. सर्व शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वामन ठाकूर यांनी केले तर आभार प्रा. जोसेफ डिसिल्वा यांनी मानले.