स्वच्छता दूतांप्रती कृतज्ञतेची राखी

Edited by: विनायक गांवस
Published on: August 09, 2025 18:59 PM
views 37  views

सावंतवाडी : सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर जि.प. शाळा सावंतवाडी नं. २ येथे रक्षाबंधनाचा आगळावेगळा उपक्रम साजरा करण्यात आला. सावंतवाडी नगरपालिका क्षेत्र स्वच्छ ठेवण्यासाठी २४ तास निष्ठेने कार्य करणाऱ्या स्वच्छता दूतांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

याप्रसंगी शाळेतील मुलींनी स्वच्छता कर्मचाऱ्यांना राखी बांधून आपुलकी, सन्मान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. विशेष आकर्षण म्हणजे “स्वच्छतेची राखी” नगरपालिकेच्या घंटा गाडीला बांधण्यात आली. या प्रतीकात्मक उपक्रमातून स्वच्छतेबाबतची जाणीव आणि कर्मचाऱ्यांविषयीचा आदर समाजापर्यंत पोहोचला. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अजित सावंत, उपाध्यक्ष श्रीमती दाभोलकर, शिक्षणतज्ज्ञ नंदू गावडे, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर,नगरपालिका सदस्य श्रीमती. संजीवनी शिरसाट, सर्व नगरपालिका स्वच्छता कर्मचारी वर्ग,मुख्याध्यापिका श्रीमती भक्ती फाले शिक्षकवर्गातील श्रीमती ठाकूर, श्रीमती जाधव, श्रीमती गावडे, श्रीमती ढवळ, श्री.सावंत तसेच अंगणवाडी कर्मचारी श्रीमती पवार आणि श्रीमती सासोलकर उपस्थित होते.कार्यक्रमाला मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपालिका व कर्मचारी याचे विशेष सहकार्य मिळाले. कर्मचाऱ्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी “हीच अमुची प्रार्थना” हे गीत सादर करून केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि स्वच्छतेबाबतची जागरूकता वाढविणारा संदेश देण्यात आला.