
सावंतवाडी : मळेवाड ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या नाविण्यपूर्ण उपक्रमांतर्गत राख्या बनविणे हस्तकलेत श्री कुलदेवता विद्यामंदिर मळेवाड शाळा नंबर २ च्या विद्यार्थ्यांनी हस्तकलेतून निर्माण केलेल्या राख्यांचा शुक्रवार दि. ८ ऑगस्टला ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेच्या आठवडा बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी स्टॉल लावला होता.
या स्टॉलमुळे मुलांना आपल्या तयार केलेल्या मालाची विक्री कशी करावी याचे थोडेसे व्यावसायिक ज्ञान प्राप्त झाले.या स्टॉलला महिलांनी चांगला प्रतिसाद देत राख्या खरेदी केल्या. या स्टॉलला ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर, उपसरपंच हेमंत मराठे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित नाईक यांनी भेट देऊन मुलांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना राख्या तयार करण्यासाठी मदत करणारे शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापक लवू सातार्डेकर मुलांसमवेत उपस्थित होते.