
सावंतवाडी : रूग्ण कल्याण नियामक समिती सदस्यपदी आमदार प्रतिनिधी म्हणून युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष श्री.दुर्गेश उर्फ देव्या रमेश सुर्याजी यांची निवड करण्यात आली आहे. सामाजिक व आरोग्य क्षेत्रात झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तीची निवड झाल्याने प्रशासनाला देखील चांगल्याप्रकारे सहकार्य होऊन आरोग्य व्यवस्थेची प्रगती होईल अस प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील व वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले.
सुर्याजी यांच्यावर सावंतवाडी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गेली १५ वर्षे देव्या सुर्याजी हे सामाजिक, आरोग्य क्षेत्रात तसेच राज्यात उद्भवलेल्या आपत्ती, कोरोना सारख्या महामारीमध्ये युवा रक्तदाता संघटनेच्या तसेच मित्रमंडळ यांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. रक्तमित्र, रूग्ण मित्र बनून उल्लेखनीय कार्य करत असल्याने माजी मंत्री, आमदार श्री.दीपक केसरकर यांनी दखल घेत रुग्ण कल्याण नियामक समिती सदस्य पदी आमदार प्रतिनिधी म्हणून त्यांची निवड केली आहे. १ मे महाराष्ट्र दिनी त्यांना निवडीचे पत्र सुपुर्द करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे,कार्यालयीन अधिक्षक हेळेकर मॅडम,डॉ. मुकुंद अंबापुरकर, डॉ. अभिजीत चितारी डॉ.देसाई आदींसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.