
सावंतवाडी : गवळीतिठा येथे सर्व्हिस लाईनमध्ये होणाऱ्या स्पार्किंगमुळे वारंवार आग लागत असून महावितरणने तात्काळ या प्रकारची दखल घ्यावी अन्यथा काही दुर्घटना घडल्यास सर्वस्वी महावितरण जबाबदार राहणार असा इशारा सावंतवाडी येथील माजी नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दिला.
भालेकर म्हणाल्या की, आज सकाळी जय ओंकार मॅचिंग सेंटर, चंद्रकांत वॉशिंग कंपनी व चारभुजा बेकरी येथे स्पार्किंग होऊन आग लागली. दिवस असल्यामुळे नगरपालिकेचा बंब बोलवून आग विझवण्यात आली. पाऊस पडल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला नाही.
तसेच आठ दिवसांपूर्वी दोन वेळा या लाईनलाच पार्किंग होऊन आग लागली होती. त्यावेळीही आजूबाजूच्या लोकांनी ती विझवली. आठ दिवसापूर्वी ही लेखी तक्रार केली होती. त्यावेळी योग्य ती कार्यवाई न केल्यामुळे आज पुन्हा ही आग लागली आहे. भविष्यात हे स्पार्किंग होऊन आजूबाजूच्या एकमेकाला लागून असलेल्या इमारतींना धोका उद्भवू शकतो. यापुढे दुर्घटना होऊ नये यासाठी योग्य ती तात्काळ कार्यवाही करावी जेणेकरून भविष्यात होणारा धोका टळेल असं मत त्यांनी व्यक्त केल. यावेळी सुनिल साळगावकर, दिलीप भालेकर, प्रदीप भालेकर, अतुल कुडव, शिवराम गवळी आदी नागरिक उपस्थित होते.