
सावंतवाडी : लिटिल सिस्टर ऑफ द पूवर आश्रम निरवडे येथील दोन्ही डोळ्यांना अंधत्व असलेली एक ८४ वर्षीय निराधार वृद्ध महिला आश्रयास असल्याचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निदर्शनास आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी डॉ.राघवेंद्र तळेगावकर यांची भेट घेऊन शस्त्रक्रियेसाठीची माहिती दिली. डॉ. तळेगावकर यांनी तिच्या दोन्ही डोळ्यांवर शस्त्रक्रिया केल्यावर त्या वृद्ध महिलेस दिसू लागले. सामाजिक बांधिलकी जोपासत या निराधार वृद्धेची शस्त्रक्रिया डॉ. तळेगावकर यांनी विनामोबदला केल्याची माहिती जाधव यांनी दिली.
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान मधील कार्यकर्ते अधून मधून जिल्ह्यातील आश्रमांना भेट देत असतात. अशाच एका निरवडे सिल्वर एकर येथील लिटिल सिस्टर ऑफ द पूवर आश्रमाला भेट दिली. त्या आश्रममध्ये नऊ वृद्ध व्यक्ती आश्रय घेत आहेत. तेथील सिस्टर त्या सर्व वृद्ध व्यक्तींची विनामूल्य सेवा व त्यांचे पालन पोषण करत आहेत. या सिस्टर तामिळनाडू, आंध्र प्रदेश मधील आहेत. यावेळी आश्रमात दोन्ही डोळ्यांना अंधत्व असलेली एक 84 वर्षीय निराधार वृद्ध महिला आश्रमात आश्रय घेत होती. तिला सांभाळणे तेथील आश्रम चालवणाऱ्या सेवाभावी सिस्टरना खूप अवघड जात होते. तिच्या ऑपरेशनसाठी त्यांनी चार वर्षे खूप प्रयत्न केले. पण, त्यांच्या प्रयत्नाला यश मिळालं नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे व हेलन निब्रे यांनी तिच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी स्वीकारली. दुसऱ्याच दिवशी रवी जाधव यांनी डॉ.राघवेंद्र तळेगावकर यांची भेट घेऊन आश्रमामधील त्या वृद्ध महिलेची सर्व हकीगत सांगितली. आठ दिवसातच डॉ. तळेगावकर यांनी तिच्या एका डोळ्याच ऑपरेशन केलं. यावेळी तिला दिसू लागल्यान दुसऱ्याही डोळ्याचं ऑपरेशन केलं. दोन्ही डोळ्यांना दिसू लागल्यान त्या वृद्धेचा आनंद गगनात न मावणारा होता.
रवी जाधव यांनी शस्त्रक्रियेचा खर्च विचारला असता डॉ.तळेगावकर यांनी तुमच्या सेवाभावी कार्यासाठी माझा पण थोडासा हातभार असं सांगत विनामूल्य शस्त्रक्रिया करत सामाजिक बांधिलकी जपली. हे ऑपरेशन डॉ. अमित पवार कोल्हापूर यांनी यशस्वीरित्या केले. त्यासाठी डॉ.राघवेंद्र तळेगावकर, डॉ. श्रद्धा परब सिस्टर तृप्ती नाईक, तळेगावकर स्टाफ मेंबर विजया संकपाळ, संदीप माजगावकर यांचे देखील मोठे सहकार्य लाभले. आश्रमच्या सिस्टर मेरी अमला, सिस्टर जस्टीना ,सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, सदस्य रवी जाधव, रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, लक्ष्मण कदम,हेलन निब्रे, प्रा. सुभाष गोवेकर यांनी डॉक्टर वर्गाचे आभार मानले.