
सावंतवाडी : ७८ वर्ष सावंतवाडीकरांना सेवा देणारी अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड सावंतवाडीचे टी.जे. एस. बी मध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे. उद्या दि. १३ मे २०२५ रोजी स. ११.०० वा. हा सोहळा संपन्न होणार आहे. गेल्या ५३ वर्षांपासून ही बॅक सेवेत आहे. आजमितीस बँकेच्या १४९ शाखा कार्यरत असून सावंतवाडी येथे बँकेच्या १५० व्या शाखेचा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे.
सावंतवाडी अर्बन बँक ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था होती. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्ह्यात होते. शहरातील व्यापारी वर्गाला आधारस्तंभ असणारी ही संस्था होती. शहरातील अनेकांना रोजगार यामुळे प्राप्त झाला होता. आता ही बँक टी.जे. एस. बी मध्ये विलीनी होणार आहे. उद्या माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या शुभहस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन शरद गांगल (अध्यक्ष), वैभव सिंगवी (उपाध्यक्ष),निखिल आरेकर (व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी) व संचालक मंडळ यांनी केल आहे.
दरम्यान, नकुल पार्सेकर यांनी यावर भाष्य करताना म्हटले आहे, सावंतवाडी शहराचा स्वाभिमान असलेल्या अर्बन बँकेचे अखेर अस्तित्व संपुष्टात आले. जुन्या जाणत्या सेवाभावी लोकांनी या शहरातील अनेक संस्था उभारून या शहराचा नावलौकीक वाढवला. ज्यामध्ये काही जुन्या नावाजलेल्या शिक्षण संस्था पण आहेत. ७८ वर्षापूर्वी स्थापन झालेली ही बॅंक त्या काळात छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांची कामधेनूच होती. ज्या बँकेच्या सहकार्याने त्या काळात व्यापाऱ्यानी आपला उद्योग व्यवसाय वाढवला व आर्थिक सक्षमीकरण केले. त्या काळात ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली आणि कोट्यवधी रूपयांची उलाढाल करणारी ग्राहक संस्था जी आता शेवटची घटका मोजत आहे. अशा संस्थाचे राजकीय अड्डे झाले की त्यांची कशी वाताहत लागते? यावर फार मोठा प्रबंध लिहिता येईल. "जागतिकीकरण आणि भारतीय रिझर्व्ह बॅकेचे आर्थिक धोरण यामुळे बँक सावरता आली नाही. अर्थात व्यवस्थापन मंडळातील अतिशय अनुभवी आणि आर्थिक विषयाचा प्रचंड अभ्यास असणाऱ्या आणि ग्राहकांमध्ये व भागधारकांमध्ये प्रचंड विश्वास संपादन केलेल्या संचालक मंडळाला त्यांच्या प्रयत्नाना यश आले नाही. नाईलाजाने सावंतवाडी शहराची अस्मिता असलेल्या सावंतवाडी अर्बन बॅकेचा फलक आज उतरवण्यात आला. आता महत्त्वाचा प्रश्न ठाणे जनता सहकारी बँक ज्या भागधारकांचे शेअर्स आहेत ते परत करणार आहेत का ? असा सवाल अँड. नकुल पार्सेकर यांनी केला आहे.