सावंतवाडी : सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे सहा पुरस्कार आज पुरस्कार निवड समितीने जाहीर केले. यामध्ये वैनतेयकार मे.द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार नागेश पाटील यांना जाहीर करण्यात आला. याशिवाय माजी आमदार व जेष्ठ पत्रकार कै जयानंद मठकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अवधूत पोईपकर यांना, कै पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार महादेव परांजपे यांना जाहीर करण्यात आला आहे. तसेच नाट्यकर्मी कै. बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार प्रवीण परब यांना व आदर्श समाजसेवक कै चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार विश्वनाथ नाईक यांना व ज्येष्ठ छायाचित्रकार कै मुरलीधर तथा बंडोपंत भिसे स्मरणार्थ छायाचित्रकार पुरस्कार अजित दळवी यांना जाहीर करण्यात आला आहे.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये सकाळी तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार निवड समितीची निवड करण्यात आली होती. या निवड समितीमध्ये सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गिरीशकुमार चौगुले, आहार तज्ञ डॉ विनया बाड, उद्योजक उदय भोसले, वकील प्रतिनिधी ऍड. संदीप निंबाळकर तसेच जिल्हा सहकार्यावाह प्रवीण मांजरेकर, गतवेळचे आदर्श पत्रकार विजेते सागर चव्हाण, पत्रकार सचिन रेडकर निवड समितीचे पदसिद्ध पदाधिकारी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, सचिव मयूर चराटकर, खजिनदार रामचंद्र कुडाळकर यांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व पत्रकार पुरस्कार निवड समितीची आज सायंकाळी बैठक सावंतवाडी येथील पर्णकुटी विश्रामगृह येथे पार पडली. या बैठकीमध्ये सर्व निवड समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सुरुवातीला प्रास्ताविक सचिव मयूर चराटकर यांनी केले. त्यानंतर पुरस्कारांच्या नावाबाबत चर्चा झाली. चर्चेनंतर पुरस्कार प्राप्त पत्रकारांची नावे घोषित करण्यात आली.