
सावंतवाडी : सावंतवाडी शहर हे एकेकाळी सुंदरवाडी म्हणून ओळखले जात असे. परमेश्वराला पहाटे पडलेलं सुंदर स्वप्न म्हणजेच आपली ही सुंदरवाडी. परंतु, मागच्या काही वर्षांमध्ये या सुंदरवाडीची अवस्था पाहता येथील शहर प्रेमीयांच्या मनाला फार वेदना होत आहेत. ज्यावेळी या शहराचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर करत होते तोपर्यंत सावंतवाडी हे शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जायचे हे कोणीही सांगेल. मात्र, आज "कुठे नेऊन ठेवली आमची सुंदरवाडी'' अशी अवस्था असल्याचे मत सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी व्यक्त केले आहे.
ते म्हणाले, आज या शहराची अवस्था फार बिक्कट झाली आहे. शहरातील काही वार्ड मधील रस्ते, गटारे, पिण्याच्या पाण्याच्या समस्या व डळमळीत आरोग्य यंत्रणे हे सहजपणे निदर्शनास येतात. आणि याचं खापर येथील प्रशासनाच्या डोक्यावर फोडल जात पण या परिस्थितीला खरे कारणीभूत जर कोण असेल तर, जे आपली मतं विकतात तेच. त्यांच्या मुळेच आजच्या सर्वसामान्य जनतेला सदर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे म्हणून आज दुःखाने म्हणावं लागत आहे. "कुठे नेऊन ठेवली आमची सुंदरवाडी." येथील आपले स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी अगदी सुशाखात शांत झोपले आहे. ते आता नगरपरिषद निवडणूक जवळ आली की मते विकत घ्यायला जागे होणार आहे. तोपर्यंत शहरातील सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना व ज्येष्ठ नागरिक पुढाकार घेऊन शहरातील शक्य होईल तेवढ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच सदरच्या परिस्थितीवर आवाज उठवत आहे.
शहरातील काही वार्ड मध्ये रस्त्याची व गटाराची अर्धवट असलेल्या कामांमुळे अपघात होत आहेत आणि येथील सामाजिक कार्यकर्ते त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करत आहे. पण याला कारणीभूत कोण? तर याचे उत्तर आहे. आपणच कारण आपण यांना निवडून दिलाय म्हणजे आता पाच वर्ष सर्वकाही सहन करावे लागेल. आम्ही सामाजिक कार्यकर्ते या जनतेसोबत आहोतच परंतु प्रश्न असा पडतो की अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या आमच्या सर्वसामान्य जनतेला खऱ्या अर्थाने वाली कोण असा गंभीर प्रश्न सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी विचारला आहे.