टर्मिनसचं काम पुर्ण न झाल्यास उग्र आंदोलन ; रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक

सावंतवाडी टर्मिनसला द्यावं प्रा.मधू दंडवतेंच नाव
Edited by: विनायक गांवस
Published on: May 16, 2023 14:02 PM
views 214  views

सावंतवाडी : सावंतवाडी स्टेशनचा कोकण रेल्वे विभागात टर्मिनस असा उल्लेख असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, अपुऱ्या सुविधांमुळे मुंबई ते सिंधुदुर्ग दरम्याने प्रवास करणाऱ्या कोकणवासिय चाकरमन्यांना याचा काहीच फायदा होत नाही. परिणामी याचा फायदा दक्षिणेतील गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू राज्यांना झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी प्रवासी संघटनेला माहितीच्या अधिकाराखाली रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी टर्मिनसला कोणत्या सुविधा दिलेल्या आहेत ते लेखी स्वरूपात कळवावे व सावंतवाडी टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडी स्टेशन मास्तर यांच्याकडे करण्यात आली. तर १२ वर्ष रखडलेल्या टर्मिनसच काम २०२४ पर्यंत पुर्ण न केल्यास उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष शांताराम नाईक यांनी दिला. 

 

याबाबतच निवेदन सावंतवाडी स्टेशन मास्तर यांना संघटनेच्या माध्यमातून देण्यात आल. यावेळी अध्यक्ष शांताराम नाईक म्हणाले, अनेक वर्ष अर्ज, विनंत्या करून त्याकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. १२ वर्ष रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसच काम २०२४ पर्यंत पुर्ण न झाल्यास कोकण रेल्वे कार्पोरेशन ते मंत्रालयावर मोर्चा काढणार, याच नेतृत्व मी करणार असा इशारा त्यांनी दिला. तर सेक्रेटरी यशवंत जडयार म्हणाले, रेल्वे प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सुसज्ज अस सावंतवाडी टर्मिनस व्हावं अशी आग्रही मागणी केली आहे. कोकण रेल्वेला २५ वर्ष होत असताना याचा लाभ दुर्देवाने कोकणवासीयांना झालेला नाही. याउलट दक्षिणेतील राज्यांना या सुपरफास्ट गाड्यांचा फायदा अधिक होत आहे. कोकण रेल्वे व रेल्वे बोर्डाकडे पॅसेंजर गाड्या व स्लो दर्जाच्या गाड्यांची मागणी केली आहे. कोकणातील प्रत्येक स्थानकावर त्या गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी केली आहे. तर सावंतवाडी टर्मिनस मार्गी लागल्यास रेल्वे प्रवाशांचे सर्व प्रश्न मार्गी लागतील. त्यामुळे सावंतवाडी टर्मीनस सुरू होऊन कोकणातील भुमिपुत्रांना त्याचा लाभ मिळावा यासाठी आम्ही आग्रही असणार आहोत.


यावेळी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबई अध्यक्ष शांताराम नाईक, सेक्रेटरी यशवंत जडयार, सदस्य भरत पंडित, खजिनदार शेखर बागवे, बाळ वेळकर, सागर तळवडेकर, सावंतवाडीकर मिहीर मठकर, विहंग गोठस्कर, सिद्धेश सावंत, सुनिल गावडे, आबा सावंत, गुणाजी गावडे, योगेश नाईक, विनोद ठाकुर, प्रशांत बुगडे, संदीप पांढरे, संतोष गावडे, बाळू गावडे, सत्यवान गावडे, सुभाष मयेकर,सुशील चौगुले, शरद जाधव, दशरथ पेडणेकर, सतिश पाथरूट, मिलिंद दहीवले, राजाराम आळवे, अमिता आजगावकर आदी उपस्थित होते.