
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, सुशोभीकरणात प्रवेशद्वारावर रेल्वे टर्मिनस ऐवजी सावंतवाडी रोड असा बोर्ड लावल्याने नवा वाद निर्माण झालाय. प्रकाराबद्दल कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली असून याबद्दल निषेधही नोंदविला आहे. गेली ९ वर्ष हा प्रश्न धूळ खात पडल्यानं शासनासह रेल्वे प्रशासनाला सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हे पाप कुणाचं ? असा खडा सवाल विचारयची दुर्देवी वेळ सावंतवाडीकरांवर आली आहे.
माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन झालेलं असताना टर्मिनस काही अद्यापपर्यंत पूर्णत्वास आलेल नाही. नुकतच सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकारातून कोकणातील रेल्वे स्थानकांच रूपडं पालटण्याची मोहीम हाती घेण्यात आली. त्यात सावंतवाडीचाही चेहरा मोहरा बदलून टाकण्याच काम रवींद्र चव्हाण यांनी केल. मात्र, संबंधित विभागाने सुशोभीकरणा दरम्यान टर्मिनस ऐवजी सावंतवाडी रोड अशी पाटी लावल्यानं कोकण रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेकडून सावंतवाडी रेल्वे टर्मिनस भुमिपूजनाचा फोटो शेअर करत सरकारला टर्मिनसची आठवण करून दिली आहे. सावंतवाडी रोड हा बोर्ड त्वरित हटवून सावंतवाडी टर्मिनस असा बोर्ड लावावा अशी मागणी संघटनेने केली आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन 9 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत व तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले होते. मात्र, रखडलेल हे काम आजतायगत पूर्ण झालेल नाही. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत कित्येकदा आवाज उठवला. मात्र आश्वासनांशिवाय हाती काहीच आले नाही. आता तर स्थानकाच्या नावातून "टर्मिनस” हा शब्द हटवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे भुमिपुजनाचा फोटोच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून शेअर करत सरकारला टर्मिनसची आठवण करून दिली गेली आहे. नुकतच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून टर्मिनससाठी उपोषण, आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी पुढाकार घेत माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांच याकडे लक्ष वेधले होते. राणेंनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घालून देतो या दिलेल्या आश्वासनाअंती हे आंदोलन स्थगित झाले. मात्र, त्यानंतरही सावंतवाडीकरांच्या हाती अद्याप काही लागलेलं दिसत नाही. उलट उघड्या डोळ्यांनी 'सावंतवाडी रोड' ही आकर्षक पाटी बघण्याची वेळ आली आहे. माजी पालकमंत्री विद्यमान मंत्री आम. दीपक केसरकर यांनी देखील मोठमोठी स्वप्न रेल्वे प्रवाशांना दाखवली. मात्र, आजमितीला आश्वासनापलीकडे ते दुसरं काहीही देऊ शकलेले नाहीत. माजी खासदार विनायक राऊत यांच्या केवळ जाहिरनाम्यातच रेल्वे टर्मिनसचा मुद्दा पहायला मिळाला. त्यामुळे तब्बल 9 वर्ष रखडलेल्या टर्मिंनसच हे पाप कुणाचं ? असा सवाल सावंतवाडीकरांना पडला आहे. अनेक वर्ष धूळ खात पडल्यानं व भुमिपूजन केलेली पाटी झुडपात गेल्यानं शासनासह रेल्वे प्रशासनाला हा खडा सवाल विचारयची दुर्देवी वेळ आज सावंतवाडीकरांवर आली आहे. की तत्कालीन मंत्री सुरेश प्रभू, देवेंद्र फडणवीस आणि दीपक केसरकर यांनी इलेक्शन मटेरीयल म्हणून भुमिपूजन एव्हेंट करत सावंतवाडीकरांची फसवणूक केली? असा सवाल सुद्धा यानिमित्ताने उभा ठाकला आहे.