
सावंतवाडी : सावंतवाडी : पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण अखेर जाहीर झाले असून यावेळचे सभापतीपद महिलांसाठी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीवर पुन्हा एकदा 'महिलाराज' पाहायला मिळणार आहे. 24 व्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे यांच्या समक्ष ही आरक्षण सोडत काढण्यात आली. मागील कार्यकाळातही सभापतीपद महिलांकडेच होते. त्यावेळी मानसी धुरी आणि निकिता सावंत यांनी सभापती म्हणून यशस्वीपणे काम पाहिले होते.
आता 'अनुसूचित जाती महिलां'साठी जागा राखीव झाल्याने, या प्रवर्गातून कोणत्या महिलेला सभापतीपदाची संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही राजकीय गटांकडून योग्य उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. यावेळीच्या सभापती या 24 व्या सभापती ठरणार असून 9 व्यांदा महिलेला संधी मिळणार आहे.










