
सावंतवाडी : सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज झालेल्या अर्ज छाननीमध्ये अवैध झालेले उमेदवारी अर्ज पाहता एकूण नगरसेवकाच्या 20 जागेसाठी 94 उमेदवारी अर्ज वैध ठरलेत. तर नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी 6 जणांचे उमेदवारी अर्ज वैद्य ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी अर्ज छाननीअंती जाहीर केले. यावेळी सर्व पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सावंतवाडी नगरपरिषदेची सर्वत्रिक निवडणूक येत्या 2 डिसेंबरला होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. तर काही अपक्षांनी सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केलेत. काल उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी एकूण 11 अर्ज दाखल झाले होते. तर नगरसेवक पदासाठी एकूण 114 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज सकाळी 11 वाजता या अर्जाची प्रत्येक वॉर्डप्रमाणे छाननी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेल्या 11 अर्जापैकी 6 अर्ज वैध ठरले. त्यामध्ये उबाठा शिवसेनेच्या सीमा मठकर, भाजपच्या श्रद्धाराजे सावंत भोंसले, अपक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, अपक्ष निशाद बुराण, शिवसेनेकडून ॲड. निता सावंत-कविटकर, काँग्रेसकडून साक्षी वंजारी यांचे अर्ज वैध ठरले. तर नगरसेवक पदासाठी प्राप्त झालेल्या 114 उमेदवारी अर्ज पैकी 20 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. त्यामुळे एकूण नगरसेवकाच्या 20 जागेसाठी 94 उमेदवारी अर्ज वैद्य ठरलेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आजपासून 21 नोव्हेंबर ही शेवटची तारीख असून या तारखेपर्यंत नेमके किती जण उमेदवारी अर्ज मागे घेतात ? त्यावरून प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची लढत स्पष्ट होणार आहे. वैद्य ठरलेल्या उमेदवारी अर्जामध्ये अपक्ष उमेदवारांचीही काही नावे समाविष्ट आहेत. नेमके अपक्ष उमेदवारी दाखल केलेले उमेदवार आपला अर्ज मागे घेतात की कायम ठेवतात हे सुद्धा 21 तारीख नंतर स्पष्ट होणार आहे.
एकूण दहा प्रभागांमध्ये शिवसेना, भाजप आणि उबाठा शिवसेना अशी लढत पाहायला मिळत आहे. तर काँग्रेसकडून 16 जागांवर आपले उमेदवार उतरविले आहेत दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पाच जागेवर उमेदवार नशीब आजमावत आहेत. सर्वच प्रभागांमध्ये तुल्यबळ अशी लढत पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेना यामध्ये खरी लढत होणार आहे. उबाठानेही काही जागांवर चांगले उमेदवार दिल्याने त्या ठिकाणीही रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. काही नाराजांकडून अपक्ष उमेदवार दाखल केली आहे. त्यांची नाराजी दूर करण्याची कसरत त्या त्या प्रभागातील उमेदवारांना करावी लागणार आहे. एकूणच 21 तारीख नंतर नगरपरिषदेच्या या निवडणुकीमध्ये अधिकाधिक रंगत वाढणार आहेत.
नगराध्यक्ष पदासाठी यावेळी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. शहरातील एकूण मतदार लक्षात घेता नगराध्यक्षपदाच्या सहा उमेदवारांमध्ये मतांची विभागणी होणार आहे. मतांच्या विभागणीमध्ये नेमक कोण बाजी मारतो ? हे ३ डिसेंबरला दिसणार आहे.










