
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेत आज झालेल्या सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीलाच जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून आक्रमक पवित्रा घेत सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरले. मुख्याधिकारी नेमके गेले कुठे ? असा थेट सवाल करत, त्यांनी प्रशासकीय नियमांवरून सभेला जोरदार विरोध दर्शवला.
यावेळी भाजप-शिवसेनेत जुंपली. नगरपालिकेची सभा सुरू होताच भाजप आणि शिवसेना सदस्यांमध्ये मतभेद दिसले. सभापती सुधीर आडीवरेकर व भाजप नगरसेवकांनी सभा तातडीने सुरू करण्यासाठी जोर लावला होता. सचिव उपस्थित नसले तरी अध्यक्ष असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र, संजू परब आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. मुख्याधिकारी नसल्याने सभेचे कामकाज नियमानुसार चालणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. मुख्याधिकारी रजेवर असतील तर पदभार कोणाकडे? आहे असा सवाल करत संजू परब यांनी प्रशासनाला जाब विचारला. जर मुख्याधिकारी रजेवर असतील, तर त्यांचा पदभार अधिकृतपणे कोणाकडे सोपवण्यात आला आहे, हे आधी जाहीर करावे. प्रभारी अधिकारी खुर्चीवर बसवा, नियमांचे पालन करा आणि मगच सभा सुरू करा, अशी मागणी करत संजू परब यांनी सभेचे कामकाज रोखून धरले. यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या इतर अधिकाऱ्यांना नियमांनुसार कार्यवाही करण्याच्या आणि आवश्यक माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या. तसेच मुख्याधिकारी रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उपस्थित प्रशासकीय अधिकारी प्रश्नांची उत्तरे देतील असे सांगितले. मुख्याधिकारी पदी प्रभारी असल्याने व सभेला ते अनुपस्थित राहील्याने वातावरण चांगलेच तापले होते.
यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी, प्रतिक बांदेकर, मोहिनी मडगावकर, विणा जाधव, सुकन्या टोपले, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, निलम नाईक, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, विरोधी शिवसेना नगरसेवक संजू परब, बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड. सायली दुभाषी, ॲड. निता सावंत-कविटकर, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, कॉग्रेसचे तौकिर शेख, उबाठा शिवसेनेचे देवा टेमकर आदी उपस्थित होते.










