सावंतवाडी न.प.ला मिळाली शववाहिका

पालकमंत्री नितेश राणेंनी केली होती सूचना
Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2025 15:49 PM
views 110  views

सावंतवाडी : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून एक शववाहिका सावंतवाडी नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आली आहे. या निर्णयामुळे सावंतवाडी शहर आणि परिसरात नागरिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

अंत्यविधीसाठी शववाहिकेची उपलब्धता होताना गैरसोय निर्माण होत होती. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून एक शववाहीनी कॅथोलिक असोशीयनला देण्यात आली होती. यात आता नगरपरिषदेच्या ताब्यात देण्यात आलेल्या शववाहीनीची भर पडली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या सुचने नुसार जिल्हा परिषदेकडील शववाहिका नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती सावंतवाडी न.प.च्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.यामुळे सावंतवाडी नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना आता गरज पडल्यास शववाहिका अधिक जलद आणि सहज उपलब्ध होणार आहे. अंत्यविधीसाठी शववाहिकेची व्यवस्था करताना होणारी धावपळ आणि आर्थिक ताण कमी होणार असून नगरपरिषदेच्या माध्यमातून ही अत्यावश्यक आरोग्य सेवा नागरिकांसाठी कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहे.