मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीस

Edited by:
Published on: December 16, 2024 19:21 PM
views 120  views

सावंतवाडी : पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पुर्वचारी देवाच्या उत्सव मुर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण निर्माण झाले असून घरी आलेल्या तरंगकाठीचे प्रत्येक घरोघरी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत व भक्तिभावाने पूजन करण्यात येत आहे.

मळगाव-सोनुर्ली देवस्थानचा सोनुर्ली माऊली जत्रोत्सव पार पडल्यानंतर मळगाव गावात पंचायतन देवस्थानची तरंगकाठी घरोघरी फिरविण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षापासून चालत आली आहे. तत्पूर्वी ही तरंगकाठी मळगाव व सोनुर्ली देवस्थान एक असल्याने मळगाव येथील रवळनाथ जत्रोत्सव झाल्यावर सोनुर्ली जत्रोत्सवासाठी नेली जाते. तरंगकाठी व पालखी जत्रोत्सवानंतर सोनुर्ली येथे पाहुणचारासाठी थांबते. तेथे पाहुणचार झाल्यावर पाच दिवसांनी मळगाव गावात आल्यावर तरंगकाठी मळगावात घरोघरी फिरविली जाते. यावेळी गावातील गोसावी मठालाही भेट देण्यात येते. यासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कुळघराकडून विधिवत तरंगकाठी व पालखीचे पूजन झाल्यावर ढोलांच्या गजरात मानकऱ्यांच्या उपस्थितीत गावचे मानकरी सावंत यांच्या घरापासून तरंगकाठी फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पाडगावकर, जोशी आदी मानकऱ्यांजवळ तरंगकाठी फिरवून गावातील गोसावी मठाला भेट देण्यात आली. त्यानंतर बाकी गावात तरंगकाठी फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी घरातील व्यक्तींनी तरंगकाठीचे विधीवत पूजन केले. तसेच देवीची ओटी भरण्यात आली. यावेळी नवस केलेल्या सुवासिनींनी तसेच नवीन लग्न झालेल्या महिलांनी देवीस साडी अर्पण करुन नवसफेड केली. या सोहळ्यात मोठ्यांसह लहान मुलेही सहभागी झाली होती. असंख्य वर्षांची ही परंपरा मळगाव गाव एकोप्याने जपत आले आहे.