सावंतवाडी महोत्सव २०२४ उद्यापासून रंगणार

Edited by: विनायक गांवस
Published on: December 28, 2024 16:42 PM
views 483  views

सावंतवाडी : दीपक केसरकर मित्रमंडळ व रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या संयुक्त  विद्यमाने 'सावंतवाडी महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवार २९ डिसेंबर रोजी ६.३० वाजता माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते तर कुडाचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.      

सावंतवाडी महोत्सव २०२४ सावंतवाडीवासीयांसाठी विविध  मनोरंजनाचे कार्यक्रम २९ डिसेंबर ते १ जानेवारी पर्यंत येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यानासमोर संध्याकाळी ठीक सहा वाजता सुरू होणार आहेत.या कार्यक्रमांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम त्याचप्रमाणे फूड स्टॉल तसेच विविध वस्तूंचे स्टॉल असणार आहेत तरी सावंतवाडी वासियांनी चार दिवस मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन दीपक भाई केसरकर मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

दिनांक २९ डिसेंबर रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित साज - ए - संगीत : सूर नवा ध्यास नवा आणि महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम - गायिका धनश्री कोरगावकर यांची मधुर संगीत मैफिल. दिनांक ३० डिसेंबर इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडी आयोजित ब्युटी कॉन्टेस्ट / मिस सुंदरवाडी २०२४ तर दिनांक ३१ डिसेंबर रोजी आवाज आर्ट इव्हेंट निर्मित 'बेधुंद २०२५ जल्लोष नववर्षाचा ' ही हिंदी - मराठी,  गीतनृत्याची बेधुंद मैफिल आयोजित करण्यात आली असून यात इंडियन आयडॉल फेम राहुल खरे, सुर नवा ध्यास नवा महाविजेती सुष्मिता धापटे-शिंदे, सारेगमप मराठी फेम  - ब्रम्हानंदा पाटणकर, गोवा आयडॉल फेम समृद्ध चोडणकर सहभागी होणार आहेत. तर सांगता समारंभाला दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी 'जल्लोष नववर्षाचा.....! सन्मान महिलांचा.....! 'सावंतवाडीत रंगणार महिलांसाठी "खेळ महापैठणीचा" हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या साठी विजेती - आकर्षक भरजरी पैठणी, उपविजेती - आकर्षक भरजरी साडी, तृतीय विजेती - मिक्सर, उत्तेजनार्थ तीन स्पर्धकांना मिळणार एक ग्रॅम प्लेटेड सोन्याची नथ अशी विविध आकर्षक बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

संपर्कासाठी 09921501214 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.