
सावंतवाडी : शहरातील गजबजलेल्या परिसर म्हणून परिचित असलेला आत्मेश्वर रोडवरील सोमवारी दुपारी घडलेल्या चोरीच्या घटनेने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी सावंतवाडीतील रहिवासी असलेल्या अनुराधा अशोक सापळे या महिलेला दोन युवकांनी चांगलेच गंडवले. वृद्ध असलेल्या अनुराधा सापळे यांचा साध्या, भोळ्यापणाचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांना "आत्मेश्वर मंदिराजवळ पोलीस उभे आहेत, तेथे काहीतरी चोरीचे प्रकार सुरू आहेत, आम्ही तुमच्या संरक्षणासाठी इथे आलो आहोत", असे सांगून त्यांच्या हातात बारीक खड्यांचे तुकडे असलेली पुडी हातात दिली व त्या दोन्ही युवकांपैकी एका युवकाने अनुराधा सापळे यांच्यासमोर एका युवकाच्या हातात आपल्या गळ्यातील चैन दिली. चैन घेत असलेल्या युवकाने सौ. सापळे यांना "काकी आपल्याही गळ्यातील मंगळसूत्र माझ्या हाती द्या, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहाल..!" असे सांगत सापळे यांना संमोहित केले. घाबरलेल्या सापळे यांनी देखील आपल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र त्या युवकाच्या हाती दिले व क्षणार्धात ते युवक तेथून प्रसार झाले. त्यानंतर हातात दिलेल्या पुडी उघडून बघितल्यावर त्यात त्यांना दगडी खडे आढळले. त्यानंतर त्यांच्या बाजूला असलेले माजी शिक्षक वाय. पी. नाईक यांच्याजवळ त्या महिलेने सदर घडलेला प्रसंग कथन केला. त्यानंतर तेथे आजूबाजूच्या नागरिकांनी महिलेला धीर देत पोलिसांना फोन केला.