सावंतवाडी शहर 'डेथ टाऊन' : डाॅ. जयेंद्र परुळेकर

राजकारण करणारे लोक श्रीमंतीकडे
Edited by: विनायक गांवस
Published on: November 19, 2025 18:02 PM
views 51  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वपक्ष उतरले आहेत. परंतु, विकासाच्या दृष्टीने पाहता कुडाळ, तारकर्ली, देवबाग या भागाचा विकास होत असताना सावंतवाडी शहर 'डेथ टाऊन' आहे. एकाही पक्षाकडे विकासाचे व्हिजन नसून राजकारण करणारे लोक मात्र श्रीमंतीकडे चाललेत असा टोला सामाजिक कार्यकर्ते डाॅ. जयेंद्र परुळेकर यांनी लगावला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, सिंधुदुर्गसह राज्यात नगरपरिषदांचे पडघम वाजू लागलेत. देशभरात निवडणूक आयोगाचा सुरू असलेला गोरक धंदा राज्यातही सुरू आहे. सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये सावंतवाडीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या चर्चाना उधाण आहे. परंतु, विकासाच्या प्रश्नावर कोणीच बोलताना दिसत नाही. या ठिकाणी कोणाकडे विकासाचे व्हिजन नाही. आज कुडाळ शहर विकासाच्या दिशेने चालले आहे. देवबाग तारकर्लीचाही विकास होत आहे. मात्र, सावंतवाडीच काय ? हा प्रश्न आहे. रेल्वे मार्ग, महामार्ग बाहेरूनस गेल्यानं सावंतवाडी वाऱ्यावर पडली आहे‌‌. वेंगुर्ल्यासारखी सावंतवाडी आज मृताअवस्थेत पडली आहे. केवळ येथील प्रसिद्ध असलेल्या हाॅटेलमध्ये वाट वाकडी करून पर्यटक येथे जेवण्यासाठी येतात.

आज खऱ्या अर्थाने सावंतवाडीकडे पाहिले असता येथील मोती तलाव, नरेंद्र डोंगर यामुळे ही सुंदरवाडी आहे. तिला अधिक सुंदर बनवण्याचे काम इतर राज्यकर्त्यांचे होते. परंतु, सत्तेच्या जोरावर गेली २० वर्ष पर्यटन महोत्सव घेतले गेले. मात्र,  पर्यटन या ठिकाणी का वाढले का ? हा विचार करणे गरजेचे आहे. मुळात ते पर्यटन महोत्सव नव्हे तर ते राजकीय महोत्सव होते. पर्यटनाच्या नावाखाली येथील जनतेला फक्त गाजर दाखवण्याचे काम करण्यात आले.

श्री. परुळेकर पुढे म्हणाले, आज बिहार प्रमाणे या ठिकाणी सुद्धा लोकांचे पलायन सुरू आहे. जवळपास 1700 ते 1800 लोकांनी आपली नावे मतदार यादीतून काढून दुसरीकडे समाविष्ट केले आहे. ही धोक्याची घंटा आहे. इथले लोक रोजगारासाठी स्थलांतरीत झालेय. मात्र, रोजगाराच्या नावाखाली राजकारण करणारे लोक या ठिकाणी श्रीमंत झालेत. त्यामुळे केवळ मटक्यावर धाडी टाकून इथली परिस्थिती बदलणार नाही. इथले लोक रोजगारासाठी स्थलांतरीत झालेय. राजकारण करणारे लोक श्रीमंत होतायत. यांची संपत्ती दुप्पट होते. आमदार, माजी मुख्यमंत्री श्रीमंत होतात. जगातल्या मोठ्या पक्षातले नेते एकरच्या एकर जमिनी घेतात. लोकांची मात्र डोकी फुटत आहे‌त‌. नारायण राणेंनी माफिया म्हटले ते त्यांच्या पक्षात आहेत. त्यामुळे अशांचे नेतृत्व करणाऱ्यांचे नगराध्यक्ष निवडून दिल्यास रिमोट कंट्रोल त्यांच्या हाती राहील. भुखंड घेण्यासाठी हे चाललंय का ? यात विकास नक्की कोणाचा असा सवाल केला. गांजा, चरस थांबला का ? जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन देखील काही होत नाही. सावंतवाडीची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख आहे. इतर शहरांच्या तुलनेत सावंतवाडी मागे पडत आहे. कॉक्रीटच जंगल इथे होत आहे. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराजांनी विविध झाड इथे लावली. मात्र, आता झाड तोडली जाते. पैसे घेऊन बांधकाम विभाग परवानगी देत. नेते आपल्या स्वार्थ साधण्यासाठी नियम पाळत नसल्याचे त्यांनी सांगितले. अंडरग्राऊंड वीज वाहिन्या, गटार आदींसह शहरातील समस्यांवर त्यांनी टीका केली. त्यामुळे निवडणूक का हव्यात ? हा प्रश्न आहे. नागरिकांच्या तोंडावर गुलाल फासण्याचे काम ही मंडळी करत असल्याचा टोला हाणला.