
सावंतवाडी : जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेले आणि सिंधुदुर्गसह गोव्याला जोडणारे महत्त्वाचे असे सावंतवाडी बसस्थानक खड्डेमय झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नव्या बसस्थानकाची केवळ घोषणा होत आहे. मात्र, त्या बसस्थानकाची दुरुस्तीही होत नसल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बसस्थानकाच्या आवारात भले मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रवाशांना या चिखलातूनच वाट काढावी लागत आहे. बसस्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला खड्ड्यांमधून आणि चिखलातून मार्ग काढण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. विशेषतः महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना यामुळे अधिक त्रास होत आहे. बस येताच खड्ड्यांमधील चिखल उडून आजूबाजूच्या प्रवाशांच्या कपड्यांवर पडतो. बस गेल्यावर बाजूच्या प्रवाशांना चिखलाचे स्नान असेच काहीसे दृश्य इथे पाहायला मिळत आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडीमध्ये बीओटी तत्त्वावर नवीन बसस्थानक उभारले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, ही घोषणा केवळ कागदावरच राहिली आहे. बसस्थानकाची सध्याची अवस्था पाहता नवीन बसस्थानक होईल तेव्हा होईल. पण, आहे तेच सुधारा अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. लाखो रुपये खर्चून तात्पुरती डागडुजी करण्याऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, असेही मत काही प्रवाशांनी व्यक्त केले.
बसस्थानकाची ही दुर्दशा प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उत्तम उदाहरण आहे. पावसाळ्यापूर्वी या खड्ड्यांची डागडुजी करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आता प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या समस्येवर तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी प्रवाशांनी केली आहे. या परिस्थितीमुळे सावंतवाडीची जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरची ओळख धोक्यात आली आहे. बसस्थानकाचे काम प्रत्यक्षात उतरणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करून तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. अन्यथा, या बसस्थानकाची अवस्था आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे.










