स्थानक प्रमुखांचा कारभार 'चिखलयुक्त पाण्यात' !

प्रवाशांचे प्रचंड हाल ! ; पैसे घेऊन मतदान केल्यास असेच भोग : बबन साळगावकर
Edited by: विनायक गांवस
Published on: July 12, 2024 10:11 AM
views 315  views

सावंतवाडी : सावंतवाडी बसस्थानकाची पुरती दैना झाली आहे. चिखलाच्या साम्राज्यात प्रवासी, विद्यार्थ्यांना कसरत करून बसावे लागत आहे. एवढंच नव्हे तर चक्क स्थानक प्रमुखांचा कारभार जिथून चालतो त्या कार्यालयात देखील चिखलाच पाणी शिरू लागलं आहे‌. त्यामुळे सावंतवाडीचं स्थानक हा बस डेपो आहे की गुरांचा गोठा ? हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सावंतवाडी एसटी बसस्थानक अद्यावत केले जाणार होते. २०१८ मध्ये या कामाचा मुहूर्तही झाला होता. परंतु, भिजत पडलेल्या या घोंगड्यासह स्थानकही पावसात भिजत पडलंय. येथील रस्त्यावर गेल्यावर्षी मलमपट्टी केलेलं डांबर उखडून रस्तेही खड्डेमय झालेत. प्लॅटफॉर्मची इमारत जीर्ण झाली असून पावसाचे पाणी आतमध्ये येत आहे. आवश्यक ती स्वच्छता या ठिकाणी होत नसल्याने प्लॅटफॉर्ममध्ये बसण्याच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे प्रवासी वर्ग तसेच विद्यार्थी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. चिखलयुक्त पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत प्रवाशांना करावी लागत आहे.  

दरम्यान, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, गेल्यावर्षी या संदर्भात आम्ही आंदोलन केलं होतं. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी याकडे लक्ष देऊन काम करावं ही आमची अपेक्षा होती. मात्र, गेली ८ वर्ष इथली परिस्थिती काही बदललेली नाही. येथून प्रवास करणारे विद्यार्थी, शासकीय कर्मचारी, शिक्षक, ज्येष्ठ नागरीक अक्षरशः मरण यातना सहन करत आहेत. मोठा पाऊस आला की स्थानकात उभं रहाणं देखील मुश्किल बनत. या वेदना स्थानिक आमदारांना समजलेल्या नाहीत. लोकांनी फार अपेक्षेन त्यांना निवडून दिलं होतं. खालच्या वेंगुर्ला स्टँण्डवर प्रसाधनगृहात जाऊ शकत नाही. कॅटींगमध्ये पाय ठेऊ शकत नाही अशी अवस्था आहे. येथे बाहेरून येणारे प्रवासी सावंतवाडी स्थानकाबाबत जे उद्गार काढतात ते लांच्छनास्पद असतात असं मत श्री. साळगावकर यांनी व्यक्त केल. तसेच लोक पैसे घेऊन मतदान करतात. हे पहीलं बदललं पाहिजे. जर हे बदललं नाही तर असेच भोग यापुढे जनतेच्या नशिबात येणार आहेत असं परखड विधान त्यांनी केलं.


१८ जुलैला जाणीव करून देणार : बबन साळगावकर

दरम्यान, प्रवाशांच्या गैरसोयी संदर्भात आम्ही पुन्हा एकदा आवाज उठवणार आहोत. मागच्यावेळी १८ जुलैला स्थानिक आमदारांच्या वाढदिनी आम्ही आंदोलन करणार असं सांगितले होतं. त्यावेळी कुणाच्या जन्मदिनी आंदोलन करू नये असं ते म्हणाले होते. परंतु, वर्षभरात स्थानकाची परिस्थिती काही बदलेली नाही. त्यामुळे येत्या १८ जुलैला त्याची जाणीव आम्ही करून देणार आहोत. आगार प्रमुखांची भेट घेऊन या प्रश्नावर आवाज उठवणार आहोत अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली.


स्थानकातील पोलीस चौकी, हिरकणी कक्ष, कॅंटींगबद्दल बोलण्याची सोय उरलेली नाही‌

याबाबत विविध संघटना तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांकडून आवाज उठवूनही आवश्यक ती खबरदारी घेतली जात नाहीय. आतातर चक्क स्थानक प्रमुखांचा कारभार जेथून चालतो त्या कार्यालयात देखील चिखयुक्त पाणी शिरलं आहे. ही परिस्थिती न बदलल्यास रेनकोट घालून काम करण्याची वेळ येथील कर्मचारी वर्गावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत स्थानक प्रमुखांना विचारलं असता 'ऑन रेकॉर्ड' बोलण्यास त्यांनी नकार दिला. लागलीच वरिष्ठांना फोन लावत याबाबत चर्चा केली.

एकंदरीतच, सद्यस्थितीत बस स्थानकाची अवस्था पहाता गुरांचा गोठा तरी बरा असंच काहीसं म्हणावं लागेल. एकीकडे, एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सुट, ज्येष्ठांना मोफत प्रवास शासन देत असताना सावंतवाडी स्थानकात होणारे हे हाल 'एसटी' रोखणार की उघड्या डोळ्यांनी केवळ बघत बसणार ? हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर 15 जुलैला सुरु होणारा प्रवासी राजा दिनात यावर काही तोडगा निघेल का ? हेही बघावं लागेल.