सावंतवाडी विधानसभा मतदार संघ हा ठाकरे सेनेचाच बालेकिल्ला : शैलेश परब

Edited by: दिपेश परब
Published on: July 29, 2023 11:55 AM
views 353  views

वेंगुर्ला : सावंतवाडी- वेंगुर्ला - दोडामार्ग हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आज या मतदार संघात फिरताना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. दीपक केसरकर यांना या विधानसभेच्या जनतेने निवडून दिल त्याची जाणीव त्यांनी ठेवली नाही. त्यांना फक्त सत्ता हवी अन्यथा ते विचलित होतात. अनेक घोषणा करतात पण हातून काही होत नाही. या सर्व घडामोडीत वेंगुर्ला तालुकाप्रमुख हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहीले याचा अभिमान आहे. त्यांनी दीपक केसरकर याना चांगलंच ओळखलं होत. ही सर्व परिस्थिती पाहता पुन्हा एकदा या मतदार संघात तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच उर्वरित ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकणार असे प्रतिपादन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांनी होडावडा येथे केले. 


       माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या "सेवा सप्ताहा" अंतर्गत शुक्रवारी २८ जुलै रोजी तुळस जिल्हा परिषद मतदार संघातील होडावडा मराठे मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळावा, गरजू शेतकऱ्यांना खत वाटप कार्यक्रमात शैलेश परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक बाळा गावडे, वेंगुर्ला तालुका संपर्क प्रमुख भालचंद्र चिपकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहरप्रमुख अजित राऊळ, युवासेनेचे हेमांशू परब, उपतालुकाप्रमुख तुकाराम परब, विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत, कोमल सरमळकर आदी उपस्थित होते. 

   यावेळी या कार्यक्रमात उपस्थित सुमारे ३०० शेतकऱ्यांना खत वाटप करण्यात आले. तसेच वजराट शाळा नं १ मधील शिष्यवृत्ती पटकाविलेले विद्यार्थी कर्तव्य बांदिवडेकर, वेदिका वजराटकर, साबाजी पडवेकर, पूर्वा परब, अश्विन सोन्सुरकर, हर्षल मेस्त्री, सोहम परब, यश गावडे, आर्यन सावंत, वेदांत पालयेकर, अजित पेडणेकर या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. तर मातोंड होडावडा पुला नजीक पुराच्या पाण्यात अडकलेल्या तुळस येथील सिद्धेश परबचे प्राण वाचवणाऱ्या मातोंड येथील ग्रामस्थ होमगार्ड समादेशक अधिकारी संतोष विष्णू मातोंडकर, ग्रामस्थ ज्ञानेश्वर मोहिते, कृष्णकांत घोगळे, विशाल घोगळे, अनिकेत जोशी, राहुल प्रभू, गिरीश प्रभू, सौरभ घोगळे, सुहास घोगळे, बाळा मोहिते, नाना मोहिते यांचा शाल श्रीफळ व गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. 

      यावेळी बोलताना बाळा गावडे म्हणाले की, भाजप सरकारने अत्यावश्यक व जिवनावश्यक वस्तूंची महागाई करुन सर्वसामान्य जनतेला जगणे कठिण बनविले आहे. या मतदारसंघात शैलेश परब यांनी सर्वत्र फिरून शिवसेना तळागाळात मजबूत केली. दीपक केसरकर यांनी तर या मतदार संघातील जनतेचा विश्वासघात केला. अशा या सत्तेसाठी लाचार झालेल्याना व महागाई करुन सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणण्याऱ्यांना येत्या निवडणूकांत धडा शिकवा. आणि सर्वसामान्य जनतेचा विचार करणाऱ्या ठाकरे शिवसेनेला सत्तेवर आणा. असे आवाहनही बाळा गावडे यांनी केले. 

     तर तालुकाप्रमुख यशवंत परब यांनी आपल्या भाषणात जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, तुम्ही सर्व शिवसैनिक कठीण काळात माझ्या पाठीशी ठाम राहिलात याचा मला अभिमान आहे. आज प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघात फिरताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. मुख्यमंत्री, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच जिल्हा नियोजन मधील सर्व रस्ते, छोटी छोटी कामे उद्धव ठाकरे  मुख्यमंत्री असताना व शिवसेना सत्तेत असताना त्यावेळी ही सर्व कामे मंजूर झाली होती. आता शिंदे गटातील नेते फक्त वलग्ना करत आहेत की हे सर्व आम्ही केलं. त्यांनी एकही विकासात्मक काम मार्गी लावले नाही. आणि मुळेच मला विश्वास आहे की, अवघ्या २ महिन्यांनंतर यांच्याकडे कोणतीही सत्ता नसणार आहे. जनता त्यांना योग्य जागा दाखवेल अशी जोरदार टीकाही यावेळी यशवंत परब यांनी केली. यावेळी जेष्ठ शिवसैनिक पाल येथील श्री मांजरेकर व वजराट येथील श्री पेडणेकर यांच्या हस्ते यशवंत परब यांचा सन्मान करण्यात आला.