
सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यकत्या सुविधा पुरविण्याबाबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, प्रदीप प्रियोळकर यांनी सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधलं.
या निवेदनात म्हटले आहे की, सावंतवाडी शहरातील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी खालील उपाययोजना त्वरीत अवलंबिण्यात याव्यात. शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची कार्यवाही त्वरीत सुरु करावी मोकाट गुरांसाठी शहरात योग्य त्या ठिकाणी कोंडवाडा उभारण्यात यावा. याबाबतीत आपलेकडे नोव्हेंबर २०२२ मध्ये आम्ही निवेदन दिलेले होते. परंतु आपणाकडून योग्य ती कार्यवाही अद्याप झालेली नाही शहरात रस्त्यांवर विजेच्या तारांवर पडून जीवितास हानी होतील अशी रस्त्याकडेची सर्व धोकादायक झाडे तोडण्यात यावीत. धोकादायक नसलेल्या परंतु रस्त्यावर व तारांवर डोकावणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडून धोका दूर करा. हल्लीच शहरात झालेल्या जिवितहानीची बाब लक्षात घेऊन याबाबतीत त्वरीत कार्यवाही करण्यात यावी.
आम्हा ज्येष्ठ नागरिकांसाठी पंतप्रधान, भारत सरकार यांनी काही सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. महाराष्ट्र शासनानेही असे निर्देश दिलेले आहेत. याबाबत आपले नगरपरिषदेकडून कोणतीही विशेष कार्यवाही करण्यात आलेली नाही. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वर छप्पर वगैरे बांधून निवाऱ्याची व्यवस्था करावी. यामुळे पावसाळ्यापासून व उन्हापासून त्यांचे संरक्षण होईल, याकरीता मोती तलावाभोवती, उद्यानवगैरे ठिकाणी विशेष अशी बसण्याची सोय करुन त्या निवाऱ्यावरील भागात योग्य असे छप्पर बांधण्यात यावे. केशवसूत कट्टयावरील जागेत व कट्टयाकडे जाणाऱ्या वाटेल दोन्ही बाजूंनी निवाऱ्याची सोय करण्यात यावी व आंत बाकडे वगैरे बसविण्यात यावेत. म्हणजे त्यांचे उन व पावसापासून संरक्षण होईल. असे निवारे नसल्यामुळे पावसाळ्यात त्यांना बसता येत नाही व संध्याकाळी करमणुक होत नाही. त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होत नाही. तसेच त्यांच्यासाठी एक मोठा हॉल वगैरे उभारण्यात यावा व त्यांना त्यात व्यासपीठ, लाऊड स्पिकर, वाद्ये वगैरेची सुविधा पुरविण्यात यावी. म्हणजे त्यांना कोजागिरी पौर्णिमे दिवशी व वाढदिवस वगैरे दिवशी करमणुकीचे कार्यक्रम सादर करता येतील. यासाठी महाराष्ट्र शासनाचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी नगरपरिषदेकडे कायम स्वरुपात ठेवलेल्या रुपये पाच लाख निधीमधून मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेचा वापर करावा. याबाबत त्यावेळी नगरपरिषदेच्या सभेत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या ठरावाची अंमलबजावणी होत नाही ती करण्यात यावी. या सुविधा त्यांना मोफत पुरविण्यात याव्यात. सर्व ज्येष्ठ नागरीक त्याचा उपभोग घेतील व त्या सर्व साधनाचे संरक्षण जतन करतील, त्यामुळे त्यांच्या जीवनात थोडा आनंद निर्माण होईल. इतरही काही आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात. त्यासाठी पंतप्रधान यांनी दिलेल्या निर्देशांकडे लक्ष पुरवावे. आपलेकडील दरवर्षीच्या अर्थसकंल्पामध्ये यासाठी पुरे निधीची तरतूद करावी.
शहरात आवश्यक त्या योग्य ठिकाणी वृक्षांची लागवड करावी. शहरात वड, पिंपळ, उंबर, चिच वगैरे झाडांची लागवड करावी. पाच ते सात टक्के झाडे अशा प्रकारची लावण्याची तरतूद वृक्ष अधिनियमात केलेली आहे. वृक्षांची गणना दर पाच वर्षाला करण्यात यावी व गणना नोंदवही ठेवण्यात यावी. दरवर्षी पावसाळ्यात ज्येष्ठ पौर्णिमेदिवशी वृक्षांची लागवड करावी व वृक्ष अधिनियमातील तरतुदींचे काळजीपूर्वक पालन करावे. सर्वसामान्य नागरीक व ज्येष्ठ नागरिकांच्या हितासाठी आपण वरील उपायांची काटेकोरपणे व सहानुभूतीपूर्वक लक्ष घालून अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.