
सावंतवाडी : भटक्या कुत्र्यांच्या विषय नगरपरिषदेत गाजला आहे. कालच चिमुकल्या मुलांवर कुत्र्याने हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर नगरसेवक तौकिर शेख, देवा टेमकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. तसेच कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्या महिलेकडून न.प. अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचे सांगत संबंधितावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
शहरातील भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण लसीकरण करण्याकामीचा प्रस्ताव सभापती प्रतिक बांदेकर यांना वाचला असता यावेळी नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरसेवक श्री. शेख व श्री. टेमकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी नगरसेवक देव्या सुर्याजी, अजय गोंदावळे, ॲड. निता सावंत-कविटकर व सभापती आनंद नेवगी यांनीही सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्यांवर निर्बंध आणावे अशी मागणी केली. प्रभारी नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेत भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी आपण कार्यवाही करत आहोत. काल जखमी झालेल्या मुलांची भेट आपण घेतली असून भटके कुत्रे व सार्वजनिक ठिकाणी खायला घालणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती श्री. निरवडेकर यांनी दिली. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, खेमराज कुडतरकर, सभापती सुधीर आडीवरेकर आदींसह नगरसेवक उपस्थित होते.










