
सिंधुदुर्गनगरी : महाआवास अभियानांतर्गत उत्कृष्ट अंमलबजावणी करत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद तसेच जिल्ह्यातील पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींनी कोकण विभागात लक्षणीय यश संपादन केले आहे. सन २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या सलग तीन वर्षांत जिल्ह्याला तब्बल ३२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण बुधवार, २५ फेब्रुवारी रोजी नवी मुंबई येथील सिडको कार्यालय सभागृहात कोकण विभागीय आयुक्तांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत केंद्र व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी सिंधुदुर्गमध्ये करण्यात येते. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), रमाई आवास योजना ग्रामीण, मोदी आवास घरकुल योजना तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना आदी योजनांचा समावेश आहे. या योजनांची गुणवत्तापूर्ण व गतिमान अंमलबजावणी व्हावी यासाठी कोकण विभागात महाआवास अभियान राबविण्यात आले होते. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याने सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी करत घरकुल योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची परंपरा कायम राखली आहे.
वर्षनिहाय कामगिरी
सन २०२१-२२ :
एकूण १९ पुरस्कारांपैकी १५ पुरस्कार सिंधुदुर्गला मिळाले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून सिंधुदुर्ग प्रथम क्रमांकावर राहिला. कुडाळ पंचायत समिती प्रथम, मालवण द्वितीय, तर कणकवली तृतीय क्रमांकावर राहिले. ग्रामपंचायत गटात गोळवण प्रथम, बोर्डवे द्वितीय व राठिवडे तृतीय ठरले. वाळू उपलब्धता सुलभ केल्याबद्दल कुडाळ तहसीलला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला. राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गतही सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रथम ठरली.
सन २०२२-२३ :
या वर्षीही जिल्ह्याने दमदार कामगिरी करत विविध गटांमध्ये १५ पुरस्कार पटकावले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रथम ठरली. देवगड पंचायत समिती प्रथम, मालवण द्वितीय, सावंतवाडी तृतीय क्रमांकावर राहिले. तळगाव, करुळ व तिर्लोट ग्रामपंचायतींना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाले. वाळू उपलब्धतेबाबत कुडाळ, मालवण व कणकवली तहसीलना गौरविण्यात आले.
सन २०२३-२४ :
या वर्षी जिल्हा परिषद व पंचायत समितींना पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळाले नाही. मात्र लोरे व निरवडे ग्रामपंचायतींना तृतीय क्रमांकाचे पुरस्कार मिळाले. या वर्षात एकूण दोन पुरस्कार प्राप्त झाले असले, तरी तीन वर्षांच्या कालावधीत मिळालेल्या ३२ पुरस्कारांमुळे सिंधुदुर्गने कोकण विभागात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर यांनी सांगितले की, घरकुल योजनांची पारदर्शक व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी, स्थानिक पातळीवरील समन्वय आणि प्रशासनाची प्रभावी कार्यपद्धती यामुळेच जिल्ह्याला हे यश मिळाले आहे. महाआवास अभियानातील या यशामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास वाटचालीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.










