
सावंतवाडी : सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत सावंतवाडी शहरासाठी मंजूर झालेल्या सुमारे ५७ कोटीच्या नळपाणी योजनेच काम चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी केला. सुर्याजी व नागरिकांनी चुकीच्या पद्धतीने होणार हे काम बंद पाडले. प्रभारी मुख्याधिकारी व न.प. पाणी पुरवठा विभाग योजनाप्रमूख देखील या कामाबाबत अनभिज्ञ असून योग्य पद्धतीने काम सुरू करावं अशी मागणी श्री. सुर्याजी यांनी केली आहे.
सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणारी मेनलाईन ही जवळपास ५५ वर्षांपेक्षा जुनी आहे. शहरातील वाढती लोकसंख्या व पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजने अंतर्गत सावंतवाडी शहरासाठी मंजूर झालेली सुमारे ५७ कोटींची नळपाणी योजना माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली. मात्र, सध्या चुकीच्या पद्धतीने हे काम सुरू आहे. नरेंद्र डोंगर ते पाळणेकोंड धरण इथपर्यंत ही मेन पाईप लाईन जाणार असून किमान पुढच्या २५ वर्षांची सोय यामुळे होणार आहे. परंतु, नगरपरिषद प्रशासनाकडून चुकीच्या पद्धतीने काम होत आहे. खोदकाम योग्य पद्धतीने होत नसून भुमिगत असणारे चारही पाईप एकावर एक अशा पद्धतीने घातले जात आहे. हे पाईप एकावर एक न ठेवता वेगवेगळे असण आवश्यक आहे. अन्यथा, भविष्यात देखभाल दुरूस्ती दरम्यान कठीण होऊ शकते व आर्थिक भुर्दंड देखील सोसावा लागू शकतो अस मत नगरसेवक सुर्याजी यांनी दिल.
तसेच योग्य पद्धतीने काम होत नसल्याचे योजनेतील जाणकारांचही मत असल्याचे त्यांनी नमूद केले.या महत्त्वाच्या मेन पाईप लाईन काम चालू असताना न.प. चे कोणीही अधिकारी, कर्मचारी जाग्यावर हजर नसतात. बेभरवशाचा कारभार प्रशासनानाचा चालू आहे. या कामाच्या मार्गदर्शनसाठी निवॄत्त पाणी पुरवठा विभागाचे अनुभवी अधिकारी यांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक असताना नगरपरिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होत आहे त्यांना या कामाची माहिती नसल्याचे दिसते. तसेच प्रभारी मुख्याधिकारी यांना याबाबत विचारलं असता ते देखील अनभिज्ञ दिसून आल्याचा आरोप श्री. सुर्याजी यांनी केला. शनिवारी माठेवाडा परिसरात होणारे काम त्यांनी रोखत पाळणेकोंड धरणापर्यंत जाणारी मेन पाईपलाईनचे काम योग्य पद्धतीने करून पुढील काम करावे, तसे न झाल्यास त्याचठिकाणी काम थांबवण्यात येणार असल्याचे इशारा त्यांनी दिला आहे. अन्यथा, ५७ कोटी रूपये पाण्यात जाण्याची भिती नगरसेवक सुर्याजी यांनी व्यक्त केली आहे.











