
सावंतवाडी : सोनुर्ली विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी आणि नॅब नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोनुर्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा व तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, सामाजिक बांधिलकी जपत राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. हे शिबिर सोनुर्ली येथील सोसायटीच्या इमारतीमध्ये पार पडले. शिबिराचे उद्घाटन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप गावकर आणि 'नॅब' संस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सोनुर्लीचे सरपंच नारायण हिराप, उपसरपंच भरत गांवकर, सोसायटीच्या उपाध्यक्ष आरती गांवकर, स्नेह नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापिका संगीता प्रभू आणि नॅबचे संचालक भालचंद्र कशाळीकर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर म्हणाले की, "नॅब संस्था संपूर्ण जिल्ह्यात अंध बांधवांसाठी समर्पित भावनेने कार्यरत आहे. सावंतवाडी (भटवाडी) येथे संस्थेचे सुसज्ज रुग्णालय असून, तेथील 'मॉड्युलर ऑपरेशन थिएटर' ही जिल्ह्याची शान आहे. केवळ सामाजिक हेतूने गरजू रुग्णांना दृष्टी मिळावी, यासाठी आम्ही माफक दरात शस्त्रक्रिया करतो. जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा."
शिबिरात गावातील ७५ नागरिकांनी आपली नेत्रतपासणी करून घेतली. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. तपासणीनंतर गरजू रुग्णांना पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी संचालक अविनाश गाड, अनंत परब, सिताराम गावकर, दिगंबर गांवकर, अजित महाडीक, निलेश गांवकर, जिवाजी गांवकर, मंदाकिनी गांवकर, अविनाश जाधव, नामदेव आरोंदेकर, विनोद ठाकूर आणि लिपिक सान्वी गावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सहसचिव अर्जुन गांवकर यांनी केले.










