
सावंतवाडी : शहराची सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेता सावंतवाडी उद्यानाच्या परिसरात असलेल्या नाल्यावर कायम स्वरुपी रंगमंचाची उभारणी करा. त्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपाचे युवा नेते ॲड. रुजूल पाटणकर व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या मान्यवरांकडून करण्यात आली.
शहरात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतात. मात्र, त्यासाठी रंगमंच उभारण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे याबाबत नगराध्यक्षा युवराज्ञी श्रध्दाराजे भोसले यांनी सकारात्मक विचार करावा, अशी मागणी केली. याबाबतचे निवेदन प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे यांना देण्यात आले. यावेळी आसावरी शिरोडकर उपस्थित होत्या. संस्थानकालीन पंरपरा लाभलेल्या सावंतवाडी शहराला सांस्कृतिक कलेचा वारसा आहे. या ठिकाणी गेली अनेक वर्षे पालिकेसह अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. हे कार्यक्रम पालिकेच्या जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानासमोर घेण्यात येतात. परंतू, त्या ठिकाणी रंगमंच उभारण्यासाठी मोठा खर्च येतो आणि तो खर्च एखाद्या सामाजिक संस्थेला किंवा नवोदित कलाकारांना परवडणारा नसतो, त्यामुळे कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा असून सुद्धा हे कार्यक्रम आयोजित करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे कलाकारांची मागणी लक्षात घेता उद्यानाच्या बाजूला असलेल्या नाल्यावर कायम स्वरुपी रंगमंच उभारण्यात यावा तसेच त्यासाठी आवश्यक असलेली अन्य सोई त्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात याव्यात जेणे करुन त्या ठिकाणी कार्यक्रम घेणे सोईचे होईल, अशी मागणी श्री. पाटणकर यांनी केली आहे. यावेळी मालवणी कवी दादा मडकईकर, ज्येष्ठ तबला वादक किशोर सावंत, ओंकार कलामंचाचे अध्यक्ष अमोल टेंबकर, एम जे डान्स अकॅडमीचे संचालक महेश जांभोरे, तबला वादक निरज भोसले, टीम शिवाजीचे संचालक शिवाजी जाधव, पूजा सावंत, भूवन नाईक आदी उपस्थित होते.










