सोनुर्ली - निगुडे मार्गावरील पूलाच्या दुरुस्तीची मागणी

Edited by: विनायक गांवस
Published on: January 09, 2026 18:30 PM
views 76  views

सावंतवाडी : सोनुर्ली-निगुडे मार्गावरील रेल्वे पुलाजवळ असलेला ओहळावरील पूल पूर्णतः कमकुवत झाले असून येत्या आठ दिवसात यासंदर्भात कार्यवाही न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर 26 जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा सोनुर्ली उपसरपंच भरत गांवकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अजित पाटील यांना दिले आहे.

सोनुर्ली ते निगुडे या रस्त्याचे दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले. मात्र, या मार्गावरील महत्त्वाच्या पुलाचे काम प्रलंबित ठेवण्यात आले. सध्या या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून तो पूर्णतः कमकुवत झाला आहे. गेल्या पावसाळ्यात या पुलाची संरक्षण भिंत कोसळली होती. येत्या पावसाळ्यापूर्वी जर या पुलाची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती झाली नाही, तर हा पूल वाहून जाण्याची दाट शक्यता आहे. हा रस्ता स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. जर पूल कोसळला तर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होईल, ज्याचा मोठा फटका शेतकरी वर्गाला बसणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपण सातत्याने या पुलाच्या कामाची मागणी प्रशासनाकडे करत आहे. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे प्रशासकीय दिरंगाईला कंटाळून आपण उपोषणाचे हत्यार अवलंबले आहे. येत्या आठ दिवसांत या पुलाबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास, २६ जानेवारी २०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग, सावंतवाडी यांच्या कार्यालयासमोर आपण उपोषणाला बसल्याण्या निर्णय उपसरपंच श्री गावकर यांनी घेतला आहे. उपोषणादरम्यान आपल्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.