
सावंतवाडी : नगरपरिषद प्रशासनाकडून सावंतवाडी बस स्थानक परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत शिवसेनेच्या नगरसेवकांना डावलल्याने आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी गटनेते बाबू कडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रभारी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना घेराव घालत जाब विचारला. सत्ताधाऱ्यांकडून जाणून-बोलून आम्हाला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न होत असल्यास आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा दिला. मात्र मुख्याधिकारी यांनी मलाच यासंदर्भात कोणी कल्पना दिली नाही असे सांगून यापुढे असे होऊ नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांना समज देण्यात येईल असे स्पष्ठ केले.
सावंतवाडी बस स्थानक परिसरात आज नगरपालिका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबवली. या स्वच्छता मोहिमेमध्ये सत्ताधारी भाजपा पक्षाचे नगरसेवक तसेच नगराध्यक्ष याशिवाय काँग्रेस आणि उबाठाचे नगरसेवकही सहभागी झाले होते. परंतु, शिवसेनेच्या सातही नगरसेवकांना या स्वच्छते मोहिमे संदर्भात कोणतीही कल्पना किंवा नोटीस नगरपरिषदेच्या प्रशासनाकडून देण्यात आली नव्हती. यासंदर्भात आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी गटनेते बाबू कुडतरकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिकेमध्ये धडक दिली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी श्री औंधकर यांना जाब विचारला. परंतु, मुख्याधिकारी यांनी आपल्यालाच या संदर्भात रात्री उशिरा कल्पना देण्यात आली. हा कार्यक्रम प्रशासनाकडून राबवत असताना सर्व नगरसेवकांना कल्पना देणे गरजेचे होते. परंतु, अधिकाऱ्यांनी असे करणे चुकीचे आहे असे सांगत आरोग्य निरीक्षक विनोद सावंत यांना बोलावून घेत चांगलेच झापले. यावेळी उपस्थित नगरसेवक अजय गोंदावळे यांनी आरोग्य निरीक्षक श्री सावंत यांना जाब विचारताना तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का ? असे प्रकार तुम्ही जाणून बुजून करता का? एकदा नव्हे तर तब्बल चार वेळा आम्हाला प्रशासनाकडून कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही, हे पूर्णतः चुकीचे आहे. विकासकामाला आमचा कधीच विरोध नाही. परंतु, प्रशासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला नियमानुसार आम्हाला कल्पना किंवा नोटीस देणे गरजेचे आहे. तस न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.










