
सावंतवाडी : सांगली नदीपात्रातील अवैध वाळू आणि दगड गोटे उत्खननाची तक्रार जिल्हाधिकारी आणि प्रशासनाकडे केल्याचा राग मनात ठेवून घराकडे जाणारा रस्ता डंपरभर माती टाकून अडविल्याचा प्रकार सांगेली येथे रात्री घडला. याप्रकरणी जमीन मालक खोत यांनी १०० नंबरला तातडीने तक्रार नोंदविल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या धक्कादायक घटनेबाबत सावंतवाडी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सांगेली येथील नदीपत्रातील वाळू आणि दगडगोटे यांचे अवैध उत्खनन सुरू असल्याची तक्रार राजकुमार राऊळ यांच्यासह श्रीकांत खोत व अन्य ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून उपोषण केले होते.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना उत्खननाबाबतचे परवाने सादर करण्यास सांगितले होते. मात्र ते परवाने सादर करू शकले नाहीत. त्यानंतर पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी प्रांताधिकार्यांना सात दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले होते. असे असताना मंगळवारी रात्री तक्रारदार खोत यांच्या घर व जमिनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर डंपर भरून माती ओतून रस्ता बंद करण्याचा प्रकार घडला. याबाबत खोत यांनी १०० नंबरला तक्रार दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी सकाळी याबाबत पोलिसांनी पुन्हा घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा हाती घेतला आहे.










