
सावंतवाडी : आपण आपल्या गावच्या मराठी शाळेत शिकलो आणि मोठे झालो, याचा सार्थ अभिमान बाळगायला हवा. MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शासकीय सेवेत उच्च पदावर जायचे असेल, तर गावच्या शाळेतील पाया अत्यंत महत्त्वाचा ठरतो. शहरीकरणाच्या फॅडमध्ये न पडता आपल्या मातीतील शाळेत शिकूनच तुम्ही उज्ज्वल भविष्य घडवू शकता," असे प्रतिपादन मेकॅनिकल इंजिनिअर सचिन सावंत यांनी केले. आंबेगाव-कुणकेरी येथील आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते दीपक सांगेलकर होते. श्री. सावंत पुढे म्हणाले की, "आजच्या युगात विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. अनेक जण या शाळेत शिकून आज डॉक्टर, वकील आणि इंजिनिअर झाले आहेत. गावची शाळा हीच विद्यार्थ्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने दिशा देते. त्यामुळे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या गावची शाळा टिकवण्यासाठी पुढाकार घ्यावा." अध्यक्षीय भाषणात दीपक सांगेलकर यांनी विद्यार्थ्यांना यशाची दिशा निश्चित करून मोठे होण्याचे आवाहन केले. लोकसेवा संघ संस्थेचे सचिव उत्तम सराफदार यांनी संस्था, शाळा आणि पालक नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन स्वतःची प्रगती साधण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात मुख्याध्यापिका अर्चना सावंत यांनी शाळा बंद होण्याच्या धोक्याकडे लक्ष वेधले. त्या म्हणाल्या की, "मराठी शाळा हे गावच्या विकासाचे केंद्र आहे. येथे केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर क्रीडा, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक उपक्रमांतून सुसंस्कृत नागरिक घडवले जातात. यावेळी व्यासपीठावर शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष राजन मडवळ, शाळा समिती सदस्य शांताराम परब, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल कदम, माजी मुख्याध्यापक भरत सराफदार, ग्रामस्थ सखाराम कुंभार, एन. घाटकर, अनंत सावंत, सुनील सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
सूत्रसंचालन विद्यार्थिनी श्रेया मेस्त्री, वार्षिक अहवाल वाचन अनुष्का सावंत, आभार प्रदर्शन आर्या सावंत यांनी केल. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक श्री. राऊळ, मिथिलेश राणे, श्रीमती सावंत, श्री. गोसावी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.










