
सावंतवाडी : आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना आता केसरी आणि पांढऱ्या रेशनकार्डधारकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या योजनेद्वारे कुटुंबाला वार्षिक ५ लाख रुपयांपर्यंतची आरोग्य सुविधा मोफत मिळणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी आपली आयुष्यमान कार्डे काढून घ्यावीत, असे आवाहन सावंतवाडीचे प्रांताधिकारी समीर घारे यांनी केले. सावंतवाडी तहसीलदार कार्यालय आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना' कॅम्पच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तहसीलदार श्रीधर पाटील, पुरवठा निरीक्षक दिपाली गोटे आणि उपजिल्हा रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रांताधिकारी घारे पुढे म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार ही मोहीम राबवण्यात येत आहे. रेशनकार्डधारकांना ही कार्डे सुलभरीत्या मिळावीत यासाठी महसूल आणि आरोग्य विभाग पूर्णपणे सहकार्य करेल. या योजनेमुळे कुटुंबाला मोठे आरोग्य संरक्षण प्राप्त होणार आहे. तसेच, सर्व धान्य दुकानदारांनी नागरिकांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे."
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी या योजनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, ही शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. शासनाने निश्चित केलेल्या रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत. भविष्यातील आरोग्यविषयक गरजा लक्षात घेता, केसरी व पांढऱ्या रेशनकार्डधारकांनी वेळ न घालवता आपली आयुष्यमान कार्डे काढून ठेवावीत. या शिबिराच्या माध्यमातून तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, नागरिकांनी संबंधित केंद्रांवर जाऊन आपली नावनोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.










