
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (ओरोस) परिसरात पोलीस ठाण्याचे नाव आणि बोधचिन्हाचा वापर करून बेकायदेशीरपणे दंडाचे फलक लावण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्री. जयंत बरेगार यांनी केला आहे. याप्रकारामुळे रुग्ण आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, संबंधितांवर भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी ओरोस पोलीस ठाण्यात केली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात काही ठिकाणी दंडात्मक कारवाईचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर 'सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे' असे नाव असून पोलिसांचा अधिकृत लोगोही वापरण्यात आला आहे. मात्र, हे फलक लावताना पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घेतली आहे का? असा सवाल श्री. बरेगार यांनी उपस्थित केला आहे. रुग्णालयात येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी या फलकांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शासकीय नियमावली किंवा कोणताही शासन निर्णय नसताना असे फलक लावणे हे बेकायदेशीर असल्याचे बरेगार यांनी म्हटले आहे.
जयंत बरेगार यांनी ओरोस पोलीस ठाण्यात दिलेल्या पत्रात खालील मुद्दे उपस्थित केले आहेत. यात सदर फलकांवर पोलीस स्टेशनचे नाव आणि लोगो वापरण्यासाठी रीतसर परवानगी घेतली आहे का? असे फलक लावण्याबाबत कोणताही शासन निर्णय किंवा परिपत्रक अस्तित्वात आहे का? जर परवानगी न घेता हा वापर झाला असेल, तर पोलीस खात्याची प्रतिमा मलिन केल्याबद्दल संबंधितांवर भारतीय न्याय संहिता २०२३ (BNS) नुसार फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर फलक लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. यावर पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










