
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निसर्गसंपन्न पारपोली येथे वन विभागातर्फे उभारण्यात आलेल्या ‘ट्री-हाऊस’, भव्य स्वागत कमान तसेच ‘पारपोली फुलपाखरू महोत्सव’ या अभिनव उपक्रमाचा उद्घाटन सोहळा शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला.
पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा, ही माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची संकल्पना असून, त्याच संकल्पनेतून पारपोली येथे ट्री-हाऊस व फुलपाखरू महोत्सव साकारण्यात आल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी सांगितले. या महोत्सवामुळे या परिसराचा कायापालट होणार असून स्थानिकांचे अर्थकारण बळकट होईल. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर मानाचे स्थान मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास आमदार दीपक केसरकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पारपोली सरपंच कृष्णा नाईक, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगरसेवक उदय नाईक, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वैभव बोराटे, उपसरपंच संदेश गुरव, वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










