
सावंतवाडी : योग क्षेत्रात उल्लेखनीय व निस्वार्थ सेवा बजावल्याबद्दल योग शिक्षक शेखर बांदेकर यांना ‘राष्ट्र सेवा पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. या राष्ट्रीय सन्मानाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडीतील हिरकणी योग केंद्राच्या वतीने काझी शहाबुद्दीन हाॅल, सावंतवाडी येथे त्यांचा आज सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात शाल व श्रीफळ देऊन शेखर बांदेकर यांचा सन्मान करण्यात आला. योगसाधक, प्रशिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बांदेकर यांनी सावंतवाडी, बांदा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून मोफत योगवर्गांच्या माध्यमातून नागरिकांना योगसाधनेचे मार्गदर्शन केले असून आरोग्य जागृतीसाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले आहे.
त्यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेत व्हिजन वेलनेस फाउंडेशन (उत्तर प्रदेश) यांच्या वतीने त्यांची राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सत्काराला उत्तर देताना शेखर बांदेकर यांनी योगाच्या माध्यमातून निरोगी समाज घडवण्याचा आपला संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी हिरकणी योग केंद्राच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.










