मराठी साहित्य संमेलनात दीपक पटेकर यांच्या कवितेची निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: December 14, 2025 11:47 AM
views 41  views

सावंतवाडी : ऐतिहासिक सातारा नगरीत १ ते ४ जानेवारी दरम्यान पार पडणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविकट्ट्यावरील सादरीकरणासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर (दीपी) यांच्या कवितेची निवड झाली आहे. त्यांच्या कवितेचे सादरीकरण दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होईल. कवी दीपक पटेकर यांनी "सुनीत" (इंग्रजी सॉनेट) काव्यप्रकारातील वृत्तबद्ध कविता कविकट्ट्यासाठी पाठवली होती. सुनीत या काव्यप्रकाराचा पाया कवी केशवसुतांनी घातला. त्यांनी चौदा ओळींच्या या काव्यप्रकाराला "चतुर्दशक" असे नाव दिले. कवी भा. रा. तांबे, गोविंदाग्रज, बालकवी यांनीही सुनीत लिहिली आहेत. मात्र सुनीतचा प्रसार आणि विशेष निर्मिती माधव ज्युलियन यांनी करून सुनीत हा शब्द रूढ केला.

अशाच आगळ्यावेगळ्या काव्यप्रकार लिहिलेल्या कवी दीपक पटेकर यांच्या कवितेची निवड झाल्याने सादरीकरणासाठीचे निमंत्रण कविकट्टा प्रमुख श्री.राजन लाखे व मुख्य समन्वयक कविकट्टा सविता कारंजकर यांनी पाठविले आहे. साहित्यिक वर्गातून त्यांच्या निवडीसाठी विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.