
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मौजे आंबोली येथील श्री देवी माऊली यांच्या वार्षिक जत्रोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित भाविकांसाठी सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. आंबोली पोलीस दूरक्षेत्राच्या वतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
देवी माऊली मंदिराला लागून असलेल्या जागेत हे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जमलेल्या ६५० नागरिक आणि भाविकांना सध्याच्या डिजिटल युगातील महत्त्वाच्या सायबर समस्यांविषयी माहिती देण्यात आली मार्गदर्शन सत्रामध्ये प्रामुख्याने डिजिटल अरेस्ट आणि विविध प्रकारचे सायबर फ्रॉड या गंभीर विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, अनोळखी लिंक्स आणि कॉल्सपासून कसे सावध राहावे, तसेच फसवणूक झाल्यास तातडीने काय करावे, याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मनीष शिंदे, रामदास जाधव, आणि गौरव परब यांनी या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करून उपस्थितांना सायबर सुरक्षिततेचे धडे दिले. जत्रेसाठी आलेल्या नागरिकांसाठी हा उपक्रम अत्यंत माहितीपूर्ण आणि वेळेवर आयोजित केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.










