फुकेरी माऊलीचा ९ डिसेंबरला जत्रोत्सव

Edited by: विनायक गांवस
Published on: December 07, 2025 16:52 PM
views 49  views

सावंतवाडी : फुकेरी येथील श्री वैजा माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी होणार आहे यानिमित्त सकाळी धार्मिक कार्यक्रमानंतर देवीला भरदरी वस्त्र सुवर्ण अलंकार व आकर्षक फुलांनी सजविण्यात येते तसेच मंदिराभोवती विद्युत रोषणाई केली जाते सकाळपासून ओठ्या भरणे नवस बोलणे आदी कार्यक्रम सुरू असतात.

सायंकाळी मानकरी यांच्या कुळघराकडून सनईच्या सुरात वाजत गाजत पालखीतून उत्सव मूर्तीचे मंदिरात आगमन होते लोटांगणासाठी संपूर्ण दिवसभर निर्जन उपवास धरलेले स्त्री-पुरुष मंदिरात जमा होतात धुपारत झाल्यानंतर मंदिराभोवती पुरुष झोपून नमस्कार करून व स्त्रिया उभ्याने नमस्कार करून लोटांगण घालून आपला नवस फेडतात यावेळी  जिल्ह्यातील, पंचक्रोशीतील व गोव्यातील लोक बहुसंख्येने उपस्थित असतात यानंतर मंदिरात पावणीचा कार्यक्रम होतो रीतीरिवाजाप्रमाणे गावातील ग्रामस्थ पारंपारिक प्रथम सत्रातील नाटकाची सुरुवात करून देतात  त्यानंतर कलेश्वर, सुधीर कलिंगड दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग सादर केला जातो

जत्रेदिवशी बांदा बसस्थानकातून मंगळवारी दुपारी 1 वाजता व दुसऱ्या दिवशी येण्यासाठी फुकेरी येथून बुधवारी सकाळी 8-30 वाजता ज्यादा एसटी बसची व्यवस्था करण्यात आली आहे तरी सर्व भाविकांनी जत्रोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन फुकेरी ग्रामस्थ व देवस्थान कमिटी यांनी केले आहे