
सावंतवाडी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियांनांतर्गत नेमळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तीन बंधाऱ्यांचे बांधकाम यशस्वी रित्या पूर्ण करण्यात आले. या उपक्रमामुळे भुजल पातळी टिकून राहण्यास मदत होणार असून येत्या उन्हाळ्यातील पाणी टंचाई वरही प्रभावी उपाय ठरणार आहे. तसेच बांधाऱ्याच्या आजूबाजूला शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाळी पिक घेण्यासाठी या बांधाऱ्या पासून मिळणाऱ्या ओलाव्याचा फायदा होणार आहे
या कामाचा शुभारंभ गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश जाधव, कृषी अधिकारी शारदा नाडेकर, शुभदा कविटकर, विस्तार अधिकारी संजय शेळके, एकनाथ सावंत, नेमळे सरपंचा दीपिका भैरे, उपसरपंच सखाराम राऊळ, ग्रामसेवक चौहान, सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील रमेश नेमळेकर नेमळे हायस्कूल चे शिक्षक राजेश गुडेकर विद्यार्थी,नेमळे ग्रामस्थ, युवक तसेच बांधकाम कामगारांनी मोठ्या उत्साहानी सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी करण्यास मोलाचे योगदान दिले.
वनराई बांधाऱ्याच्या माध्यमातून पावसाच्या पाण्याचे संधारण होऊन शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाणी उपलब्ध राहणार आहे तसेच जलसंवर्धनाबाबत ग्रामपंचायतीचा दूरदृष्टी दृष्टी कोन अधोरेखित झाल्याचे यावेळी पदाधीकाऱ्यांनी सांगितले तसेच अजून काही ठिकाणी बंधारे उभारण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायतिकडून सांगण्यात आली आहे. गावच्या विकासासाठी जलसंधारण हा मूलभूत घटक असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियांनांतर्गत नेमळे ग्रामपंचायतीने घेतलेला हा उपक्रम आदर्शवत असल्याचे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.










