
सावंतवाडी : सोनुर्ली - पोट्येकुंभेवाडी येथून जाणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यावर दोन्ही बाजूने भलेमोठे भगदाड पडल्याने हा रस्ता चार चाकी वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. त्याबाबत संबंधित विभागाने तत्काळ उपयोजना आखावी अशी मागणी सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर व ग्रामस्थ चंद्रकांत मुळीक यांनी केली आहे.
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून अलीकडेच बांगडेवाडी,पोट्येकुंभेवाडी ते पाडलोस या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले मात्र पाडलोस गावाच्या हद्दीवर येणार्या मोरीवजा पुलाचा भागातील जमिनप्रश्नी जमिन मालकांने कोर्टात दावा दाखल केल्याने या रस्त्याच्या कामाला न्यायालयाने जैसे थे ऑर्डर दिली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत अडकले आहे. मात्र यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्याच्या एका बाजुने मातीचा भाग पुर्ण तुटून गेल्याने रस्त्या धोकादायक बनला आहे. तसेच गेल्या दोन दिवसात या रस्त्याच्या पुलाला दोन्ही कडेने भगदाड पडल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. सदर रस्त्याची पाहणी आज सोनुर्ली उपसरपंच भरत गावकर व ग्रामस्थ चंद्रकांत मुळीक यांनी पाहणी केली. या मार्गावरून होणारी वाहतूक लक्षात घेता सदर रस्त्याची मुख्यमंत्री ग्रामसडक कार्यालयाकडून त्वरित दखल घेऊन हा रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित बनवावा अशी मागणी केली. तसेच वाहनधारकांनी या रस्त्यावरून वाहतूक करताना किंवा वाहने चालवताना सुरक्षितता बाळगावी असे आवाहनही त्यांनी केले.
पाडलोस मार्गे सोनुर्ली हा रस्ता शॉर्टकट म्हणून वाहणारा पंसत करतात या न्यायालयीन बाब असलेला भाग वगळता इतर रस्ता वाहतुकीसाठी योग्य असल्याने या रस्त्याचा वापर सर्रास केला जातो त्यामुळे संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष घालून सदरचे भगदाड बुजून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा असे आवाहन श्री गावकर यांनी केले आहे.










