सावंतवाडीत बंडखोरीचा फटका बसणार नाही !

निलेश राणेंच्या टीकेला कामातून उत्तर देऊ ! | संजू परबांच्या आरोपात तथ्य नाही : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत
Edited by: विनायक गांवस
Published on: November 24, 2025 12:55 PM
views 263  views

सावंतवाडी : जिल्ह्यात ४ ही ठिकाणी भाजप स्वबळावर लढत आहे. प्रचारात आघाडी घेतली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व नगरसेवक पदासाठीचे ८१ उमेदवार रिंगणात आहेत. भाजप विकासाच्या मुद्यावर लढत आहे. चारही ठिकाणी नगराध्यक्ष पदासह आमचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी व्यक्त केला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सावंत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात भाजपच नाव करत आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल होत आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर त्या क्षेत्राचा कायापालट करते. वेंगुर्लेत भाजपची सत्ता होती‌. त्यावेळी देशात नावलौकिक प्राप्त केला. खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणेंची साथ आम्हाला विकासासाठी लाभते. त्यामुळे आमचा विजय निश्चित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच व्हीजन चांगलं आहे‌.  देशात, राज्यात व्हीजनरी नेतृत्व आहे‌. त्यामुळे नव्या पिढीच नेतृत्व त्या करत असून सावंतवाडीकर त्यांना संधी देतील असाही विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. 

दरम्यान, नारायण राणे स्टार प्रचारक आहेत. त्यांच्या सभा होणार आहेत. सावंतवाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आदींपैकी स्टार प्रचारकांची सभा सावंतवाडीत होईल, त्याबाबतची माहीती लवकरच जाहीर केली जाईल. तर जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या आरोपांत तथ्य नाही. निलेश राणेंच्या टिकेला कामान उत्तर देऊ, शब्दानं उत्तर देणार नाही‌. कुणाच्या जवळ असल्यानं पद मिळत नाही असंही स्पष्टीकरण त्यांनी दिल‌. विशाल परब यांना भाजपात घेताना नारायण राणेंना विचारात घेतलं नाही यात कोणतही तथ्य नाही. विशाल परब राज्याचे उपाध्यक्ष होते‌. राज्याच्या नेत्यांनी निलंबन रद्द केलं. वरिष्ठ पातळीवर काय ठरलं त्याबाबत कल्पना नाही. नारायण राणे राज्यातील मोठं नेतृत्व आहे. तर सावंतवाडीत नगराध्यक्ष आमचे होते‌. पण, कोरोनाकाळ, बहुमत नसल्याने काही विकासकाम राहीलीत ती पूर्ण होतील‌ असा विश्वास श्री‌ सावंत यांनी व्यक्त केला. बंडखोरीचा फटका बसण्याची शक्यता नाही असं विधान अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या प्रश्नावर त्यांनी केलं. यावेळी भाजप युवा नेते संदीप गावडे, माजी नगरसेवक मनोज नाईक, रविंद्र मडगावकर, गुरूनाथ पेडणेकर, शितल राऊळ आदी उपस्थित होते.