
सावंतवाडी : भाजप युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडीत सुरू केलेल्या जनसंपर्क व सुविधा केंद्राची पाहणी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली. या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी असे केंद्र हे लोकसेवेचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगितले. या केंद्राचा लाभ जनसामान्यांना होत असून मोफत सेवा दिली जात आहे.
ॲड. नार्वेकर यांनी अशा प्रकारचा “पॅटर्न” सर्व आमदारांनी आपल्या जिल्ह्यात राबवावा, अशी सूचना केली. विशाल परब यांच्या माध्यमातून या सेवा केंद्रातून ग्रामीण आणि तळागाळातील नागरिकांना मोफत दाखले, रुग्णवाहिका सेवा तसेच विविध प्रकारची मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गोरगरिबांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास विशाल परब यांनी व्यक्त केला.सेवा केंद्रात सर्व प्रकारचे दाखले मोफत दिले जातील. त्यामुळे स्थानिकांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल.”या केंद्रात दोन जनसंपर्क कार्यालये व चार कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत राहणार असून, मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी नियमित संपर्क ठेवला जाणार आहे. तसेच आठवड्यातील ठराविक दिवशी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.“आपल्या कार्यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोहोचवणे आणि गोरगरिबांच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहणे हेच आमचे ध्येय आहे. सामाजिक काम पुढेही सातत्याने सुरू ठेवणार,” असे परब यांनी नमूद केले.यावेळी भाजप शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










