
सावंतवाडी : सावंतवाडी जनता, श्री देव पाटेकर आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे व माजी मंत्री, आमदार रविंद्र चव्हाण यांच्यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो. त्यामुळे कुणी नगराध्यक्ष केलं हा विषय येत नाही. ७० वर्ष आमचं वास्तव्य इथे आहे, असं मत शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केले. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परब म्हणाले, मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो त्यात सर्वात महत्त्वाची साथ सावंतवाडीच्या जनतेची होती. नारायण राणे, रवींद्र चव्हाण यांच्यामुळे मी नगराध्यक्ष झालो. बाकी कोणाचाही संबंध नाही, असे विधान त्यांनी केले. तसेच जे आमदार झाले ते महायुतीच्या माध्यमातून झालेत. दीपक केसरकर यांची सावंतवाडी विधानसभा मतदार संघात मोठी ताकद आहे. यापूर्वी सुध्दा त्यांनी दोन वेळा राजन तेली यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. तेव्हाही ते निवडून आले होते. केसरकरांची ताकद वैयक्तिक आहे. ते महायुतीतून निवडून आले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत कोणी कोणाला आणलं ते कळेल, असे ही त्यांनी सांगितले. श्री. परब यांनी आज मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या विधानावर आज प्रत्युत्तर दिले. यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सचिव परिक्षित मांजरेकर, तालुकाध्यक्ष नारायण उर्फ बबन राणे, शहराध्यक्ष बाबू कुडतरकर, विनायक म्हाडेश्वर, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष क्लेटस फर्नांडिस, सुधन कवठणकर यांसह अन्य उपस्थित होते.











