
सावंतवाडी : शक्तीपीठ महामार्ग हा केवळ मोठ्या भांडवलदारांसाठी असून त्याचा सर्वसामान्य माणूस, शेतकरी आणि बागायतदार यांना किंचितही फायदा होणार नाही. उलट तो खनिज वाहतुकीसाठी वापरला जाईल, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांमध्ये विपुल निसर्ग सौंदर्य आणि खनिज संपत्ती आहे. महामार्गासाठी भुयारी मार्गाच्या नावाखाली होणारे उत्खनन फक्त आर्थिक फायद्यासाठी असून, निसर्ग सौंदर्य आणि खनिज संपत्तीचे लचके तोडण्यास आम्ही कदापि अनुमती देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी सिंधुदुर्ग शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वैचारिक मेळाव्यात बोलत होते. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, राज्य समन्वयक समितीचे गिरीश फोंडे, कॉम्रेड संपत देसाई, डॉ. जयेंद्र परुळेकर, सतीश लळीत, माजी सभापती भगवान देसाई, इर्शाद शेख, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, गोकुळचे सदस्य प्रकाश पाटील, नितीन पाटील, संदीप सावंत,प्रा सुभाष गोवेकर, विद्याप्रसाद बांदेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कोकणच्या विकासासाठी मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे अजूनही अपूर्ण असताना, शक्तीपीठ महामार्ग कशासाठी? याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही. हा महामार्ग बड्या भांडवलदारांना आणि खनिज वाहतुकीला फायदा मिळवून देण्यासाठी लादला जात आहे. फक्त धार्मिक भावनांना खतपाणी घालून लोकांचा विरोध कमी करण्याचा स्वार्थी हेतू सरकारचा आहे.
हा महामार्ग म्हणजे महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न आहे. समृद्धी रस्त्यांच्या कामातील आकडेवारी उपयोगी ठरली, म्हणून हा पर्याय सुचवला गेला आहे. महामार्गावरील खर्च ८६ हजार कोटींवर नेऊन पुढील निवडणुकीत मतदारांना पैसे वाटण्याची तरतूद (प्रत्येकी पाच हजार रुपये) यात असल्याचा संशय राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रस्त्यांच्या कामांचे आर्थिक महत्त्व कळून चुकल्यानेच हा महामार्ग रेटत आहेत, असे ते म्हणाले. बाजीप्रभूंनी जशी पावनखिंड लढवली, त्याचप्रमाणे महामार्गावरील बाराही जिल्ह्यांमध्ये शेतकरी 'पावनखिंड' लढवत आहेत. कोकणातील लोकांना ज्या महामार्गाचा फायदा होणार नाही, त्याचा सर्वे हाणून पाडला पाहिजे आणि कोकणात त्यांना पाय ठेवू दिले नाही पाहिजे, असे आवाहन शेट्टी यांनी केले. मुख्यमंत्री काही भाग वगळण्याचे भाष्य करत असतील तर त्यांना कर्नाटकला जावे लागेल, असा टोला राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.आमदार दीपक केसरकर यांनी हा रस्ता रेडी बंदराला जोडण्याबाबत केलेल्या विधानावर टीका करताना, केसरकर यांना नागपूरला जाण्यासाठी कोल्हापूरला यावे लागेल, हे त्यांनी ध्यानात घ्यावे, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ गावांमधून जाणारा हा रस्ता इको सेन्सिटिव्ह झोनमधून जात असून त्यामुळे निसर्ग सौंदर्य, पाण्याचे झरे आणि खनिज संपत्तीवर विपरीत परिणाम होणार आहे, असे डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी सांगितले.माजी आमदार वैभव नाईक यांनी जनतेच्या महामार्गावरील विरोधाला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले. कॉम्रेड संपत देसाई आणि इतर वक्त्यांनी देखील आंदोलनासाठी जनतेने पुढे यावे, आम्ही सोबत आहोत, असे आवाहन केले.













