
सावंतवाडी : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून शहरात तब्बल दोन कोटीची विकास कामे मंजूर झाली असून आणखीन एक कोटीचा निधी त्यांच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. सावंतवाडी शहराचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी नेहमीच अग्रेसर राहणार असून सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही हे काम करणार असल्याचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष लखमराजे भोसले यांनी सांगितले. भारतीय जनता पार्टी नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्ष पदाची जागा लढवण्यास इच्छुक आहे. सद्यस्थितीत आमच्याकडे ६ इच्छुक उमेदवार असून युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या नावालाही पसंती दर्शवली आहे. परंतु, उमेदवार निश्चितीच काम वरिष्ठ नेते करणार असल्याचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांनी सांगितले.
येथील भारतीय जनता पार्टीच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, उदय नाईक, केतन आजगावकर, दिलीप भालेकर, नाईक, लवू भिंगारे, दिपाली भालेकर आदी उपस्थित होते. लखमराजे भोंसले म्हणाले, भारतीय जनता पार्टी नेहमी विकासकामात अग्रेसर राहिली आहे. सावंतवाडी शहरांमध्ये विकास कामांबरोबरच पर्यटन वाढवण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांची आम्हाला भक्कम साथ आहे. त्यांच्या माध्यमातून सद्यस्थितीत शहरात दोन कोटीची कामे मंजूर झाली असून अजून एक कोटीची कामे त्यांच्या माध्यमातून मंजूर होणार आहेत. शहरातील जी कामे झालेली होती त्या कामाबाबतचा आढावा त्यांनी घेतला होता. आम्ही सुचवलेल्या कामाला त्यांनी तात्काळ निधी उपलब्ध करून दिला आहे.
शहराध्यक्ष आडीवरेकर म्हणाले, सावंतवाडी नगर परिषदेत निवडणुकीचा विचार करता या ठिकाणी आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. आम्ही नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक पदाच्या जागाही लढवणार आहोत. तशा प्रकारची चाचपणी करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पदासाठी आमच्याकडे अद्यापतरी सहा जणांची नावे इच्छुक म्हणून आलेली आहेत. यामध्ये राजघराण्याच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांचेही नाव आहे. आम्ही त्यांच्या नावाची मागणी वरिष्ठ पातळीवर करणार आहोत. परंतु, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण ? हा निर्णय वरिष्ठ पातळीवरच घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर माजी नगरसेवक मनोज नाईक यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी मागे केलेली विधान तपासावी असे मत व्यक्त केले.













